
ठाणे – निलेश घाग ठाणे दिवा मुंब्रा डोंबिवली कल्याण या शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न जटील असतानाच आता फेरीवाल्यांनी नविन शक्कल लढविण्यास दिवाळीपासून सुरुवात केली आहे. शहरात कोठेही स्टॉल, हातगाडी लावा त्यावर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय नेत्यांचे फोटो झळकवण्यास फेरीवाल्यांनी सुरुवात केली आहे. दिवाळीतील फटाक्यांच्या स्टॉल नंतर आता डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरात फेरिवाले अतिक्रमण करु लागले आहेत.


हा प्रभाग फेरिवाला मुक्त असताना तेथे शिव-वडा पावची गाडी लागली असून त्यावर मुख्यमंत्री व खासदार शिंदे यांचे बचावासाठी फोटो लावण्यात आले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर हा मागील आठ वर्षापासून फेरिवाला मुक्त प्रभाग आहे. मात्र या रस्त्यावर आता फेरिवाल्यांचे अतिक्रमण वाढू लागले आहे. रसवंती गृह, शिववडा पावची गाडीने या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण केले आहे. ना फेरीवाला क्षेत्रातील अनधिकृत टपरी आणि स्टॉलवर कारवाईची मागणी येथील नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.
लोक प्रतिनिधींकडून या गाड्यांवर कारवाई होऊ नये म्हणून दबाव टाकण्यात येत आहे. दिवाळीत देखील अशाच पद्धतीने राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो स्टॉलवर लावत व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता आपला व्यवसाय केला.
स्थानिक नागरिकांनी तक्रारी करुन देखील पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
जाहिरात

जाहिरात

