*श्रीनगर-*;जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमधील चत्तरू येथे शुक्रवारी (१३ सप्टेंबर) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
व्हाइट नाइट कॉर्प्सचे नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. सुरक्षा दलांनी जंगलात लपलेल्या ३-४ दहशतवाद्यांना घेरले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चत्तरू पट्ट्यातील नैदघम गावात जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. कारवाई सुरू आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, लष्कराने परिसराला वेढा घातला असून परिस्थिती गंभीर आहे.
*बारामुल्लामध्येही चकमक , कठुआमध्ये दोन दहशतवादी ठार….*
दुसरीकडे, शुक्रवारी रात्री उशिरा बारामुल्लाच्या चक टेप्पर क्रिरी पट्टण भागातही चकमक सुरू झाली. काश्मीर झोन पोलिसांनी X वर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली. पोलिस आणि लष्कर घटनास्थळी हजर आहे. सध्या फारशी माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान कठुआच्या खंडारामध्येही लष्कराची कारवाई सुरू होती. येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
*11 सप्टेंबर रोजी दोन दहशतवादी मारले गेले….*
11 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराने सांगितले की, लष्कराच्या फर्स्ट पॅरामधील जवानांना उधमपूरच्या खंडा टोपच्या जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.
यानंतर पोलिसांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली. दुपारी 12.50 वाजता दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. सुमारे चार तास चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.