
नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी कंपनीला सरकारने आवश्यक तो परवाना दिला आहे.
दूरसंचार विभागाने (DoT) स्टारलिंकला ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) लायसन्स दिले आहे. स्टारलिंक आता भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकते. भारती एअरटेल-यूटेलसॅटची वनवेब आणि रिलायन्स जिओनंतर स्टारलिंक ही सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवणारी भारतातील तिसरी कंपनी आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली. लवकरच सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी स्पेक्ट्रमचे वाटप होईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सेवा सुरू होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. ॲमेझॉनचा प्रोजेक्ट कुइपर देखील भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी लायसन्स मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
पृथ्वीच्या खालच्या कक्षेत अनेक सॅटेलाइट अर्थात कृत्रिम उपग्रह लावून त्यांच्या मदतीने इंटरनेट दिले जाईल. यासाठी वापरले जाणारे सॅटेलाइट अर्थात कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने दुर्गम भागात प्रभावी ठरणार आहे. भारतातील स्टारलिंकच्या ग्राहकांना २५ ते २२० एमबीपीएस पर्यंत डाउनलोड स्पीड असलेले इंटरनेट मिळेल, असे कंपनीकडून सांगितले जात आहे. भारतात स्टारलिंकचा अनलिमिटेड डेटा प्लॅन साडेआठशे ते नऊशे रुपयांत उपलब्ध होईल असा प्राथमिक अंदाज आहे.