भारताला UNSC मध्ये स्थायी
सदस्यत्व का नाही? : एलन मस्क

Spread the love

वॉशिंग्टन :- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UNSC) भारताच्या स्थायी सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. टेस्लाचे सीईओ अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) स्थायी सदस्य म्हणून भारताला सहभाग करुन न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी UNSC मध्ये भारताला सहभागी न करुन घेणे म्हणजे “मूर्खपणा” असल्याचे म्हटले आहे. UNSC मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे सांगत त्यामध्ये फेरबदल करण्याची मागणी मस्क यांनी केली आहे.
“एखाद्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. समस्या अशी आहे की ज्यांच्याकडे सर्वात जास्त ताकद आहे ते ती सोडण्यास तयार नाहीत. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान न मिळणे हा तर मूर्खपणा आहे, असे मस्क यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
आफ्रिकेला एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च संस्थेत स्थायी सदस्यत्व मिळायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
भारत अनेक वर्षांपासून UNSCमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना प्रामुख्याने चीनकडून विरोध झाला आहे, ज्याने भारताचा UNSC मध्ये समावेश रोखण्यासाठी त्यांच्या व्हिटो अधिकाराचा वापर केला आहे. असे असतानाही अमेरिका आणि फ्रान्ससह इतर स्थायी सदस्यांनी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.
UNSC मध्ये ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि चीन हे सध्या पाच स्थायी सदस्य देश आहेत. ज्यांना P5 म्हणून संबोधले जाते. या राष्ट्रांना ठरावांना व्हिटो करण्याच्या क्षमतेसह महत्त्वपूर्ण अधिकार आहेत. दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडून आलेल्या गैर-स्थायी सदस्यांचा परिषदेच्या अजेंड्यात सहभाग असतो. पण त्यांच्या स्थायी सदस्यांसाठी असलेल्या व्हिटो अधिकार त्यांना मिळत नाही.
अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तुलना ”सदस्यांचा एक समूह असलेल्या जुन्या क्लबशी केली. ज्यांना UNSCमधील त्यांची पकड सोडू द्यायची नाही”. असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी वाढता जागतिक पाठिंबाही अधोरेखित केला होता.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page