
रत्नागिरी l 19 एप्रिल- शॉर्टसर्किटमुळे जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत १८ जनावरांपैकी ११ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत तीन जनावरे जखमी झाली असून, दोघांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री रत्नागिरी तालुक्यातील गोळप-डॉगरेवाडी येथे घडली असून, यामध्ये १५ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले आहे.
गोळप-डोंगरेवाडी येथील वसंत महेश्वर बापट यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा आहे. गुरुवारी रात्री गोठ्याला अचानक आग लागून जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत मृत्यू झालेल्या जनावरांची किंमत साधारण साडेसात लाख रुपये इतकी आहे. तसेच या आगीत जनावरांच्या वैरणाच्या ८० हजारांच्या २५ हजार पेंढ्या जळून गेल्या. तसेच जळीत गोठ्याची किंमत ७ लाख इतकी असून, एकूण १५ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी पाहणी केली. या दुर्घटनेची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.