
दापोली:- तालुक्यातील लाडघर येथे मंगळवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. इन्व्हर्टरची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने ६२ वर्षीय पर्यटन व्यावसायिक सुनील होलम यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हॉटेल ‘सुखसागर’चे मालक आणि लाडघरमधील रहिवासी असलेल्या होलम यांचा पर्यटन, शेती व बागायती व्यवसाय होता. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी पर्यटन व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केली होती. मंगळवारी दुपारनंतर घरीच इन्व्हर्टरचे काम करताना अचानक विजेचा शॉक लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. तात्काळ त्यांना रिक्षामधून दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतण्या, पुतणी, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने लाडघरमधील पर्यटन व ग्रामस्थ वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.