राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं आपला उमेदवार उभा केलाय. त्याच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानात आले होते. या उमेदवाराला भाजपाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राबाहेर एकनाथ शिंदे आपली ताकद दाखवू शकतील की नाही, हे पाहणं औत्युक्याचं असेल.
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तेथे ते एनडीएच्या उमेदवाराचा प्रचार करतायेत.
राजस्थानात शिवसेनेचा उमेदवार-
एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच राजस्थानच्या उदयपूरवाटी मतदारसंघातून माजी मंत्री राजेंद्र गुढा यांना उमेदवारी दिली. ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. राजेंद्र गुढा यांच्या समर्थनात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी मोठी प्रचारसभा सुद्धा घेतली होती. एकीकडे महाराष्ट्रात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात खरी शिवसेना कोणाची याबाबत अजूनही न्यायालयीन लढाई सुरू असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदे राजस्थानात आपला उमेदवार उभा करून प्रथमच राज्याबाहेर पक्षाची ताकद आजमावतायेत
▪️एकनाथ शिंदे यांची राजस्थानात एन्ट्री-
राजस्थानमधील विधानसभांच्या एकूण २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या २०० जागांमध्ये एक जागा सर्वाधिक चर्चेची ठरली, ती म्हणजे उदयपूरवाटी विधानसभेची जागा. या जागेवरून काँग्रेसचे माजी मंत्री आणि लाल डायरी प्रकरणामुळे चर्चेत आलेले राजेंद्र गुढा निवडणूक लढवत आहेत. राजेंद्र गुढा यांनी दोन महिन्यापूर्वीच काँग्रेसला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला होता.
▪️कोण आहेत राजेंद्र गुढा….
राजेंद्र गुढा गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ते बसपामधून निवडून आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते मंत्री बनले. परंतु निवडणुकीच्या आधी लाल डायरी आणि महिला संरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजेंद्र गुढा यांच्या शिवसेना प्रवेशामागे भाजपाचा हात असल्याचं बोललं जातंय. त्यांना जिंकून आणण्यासाठी भाजपानं पूर्ण ताकद लावली होती.
▪️विश्वासघात होणार नाही.
बुधवारी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजेंद्र गुढा यांच्या प्रचारासाठी उदयपूरवाटी मतदारसंघात गेले होते. तेथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. सामंत यांच्या भाषणापूर्वी गुढा यांनी त्यांना महाराष्ट्रात असलेल्या राजस्थानी लोकांसाठी काहीतरी करण्याची विनंती केली. त्यावर उदय सामंत यांनी, राजस्थानातील लोकं महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास दिला. तसेच गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला असून त्यांचा विश्वासघात होणार नाही, असंही सामंत म्हणाले.
▪️पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राजस्थानमध्ये प्रचार सभेत बोलताना, ज्या राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे ती राज्य मोठ्या गतीनं विकास करत असल्याचं म्हटलं. “राजस्थानमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असून तेथे माता भगिनी सुरक्षित नाहीत. केंद्राकडून राज्याच्या विकासासाठी जेव्हा १ रुपया येतो, तेव्हा त्यातील १५ पैसे कामी येतात आणि ८५ पैसे भ्रष्टाचारात जातात, असं राजीव गांधींनी म्हटलं होतं. मात्र मोदी सरकारमध्ये जर केंद्राकडून १ रुपया राज्याला मिळाला, तर तो संपूर्ण खर्च होतो”, असा दावा त्यांनी केला. आपल्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच तोंड भरून कौतुक केलं. राम मंदिर बांधणं हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होतं असं ते म्हणाले. आता २२ जानेवारीला हे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होत असून, ते यशस्वी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.