जळगाव:- आज जामनेर येथील शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले.यामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, कांद्याला पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, पिक विमा कंपनीकडून मदत मिळावी, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, महावितरणाकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्यात यावी, शेती पंपाला दिवसा बारा तास सुरळीत वीज देण्यात यावी अशा मागण्यासाठी एक दिवशीय उपोषण राष्ट्रवादीतर्फे जामनेर येथे करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, विजय देसले राष्ट्रवादी नेते संजय गरुड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विलास राजपूत,अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितले की, ‘जळगाव जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघेही एकनाथ शिंदे व फडणवीस यांच्या जवळचे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावा मिळावा यासाठी बोललं पाहिजे. कारण, आज जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही. एकेकाळी गिरीश महाजन यांनी सात हजार रुपये कपाशीला भाव मिळावा यासाठी आंदोलन केले होते. मग आता गेले कुठे? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते फॉरेन दौऱ्यावर फिरत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.
आज शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, कपाशीला भाव नाही,ज्वारीला भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून उद्या नवीन कपाशी पिकाची लागवड होणार आहे. मात्र, कपाशीला भाव नसल्यामुळे आजही मागच्या वर्षाची कपाशी घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे, अशी प्रतिक्रिया जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेल्या एक दिवसीय लक्षणिक उपोषण प्रसंगी बोलताना एकनाथ खडसे यांनी दिली आहे.