मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कोकण दौऱ्यानंतर कामाला अधिक गती आली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची एक बाजू पूर्ण करण्याचा आणि डिसेंबर २०२३ पर्यंत दुसरी बाजू पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी मंत्री चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पक्षाला बळकटी यावी, बूथ समित्या अधिक सक्षम व्हाव्यात, केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय, वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत जाव्यात, यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगला समन्वय आहे आणि भविष्यात तो अजून चांगला होईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्राचे अनेक प्रकल्प मागे पडले होते. राज्य सरकारने त्यासाठी आपला हिस्सा न दिल्यामुळे काही चांगल्या योजना राबवल्या गेल्या नाहीत. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असे ते म्हणाले.