मुंबई : शैक्षणिक वर्ष 2023-24 म्हणजेच येत्या जूनपासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
येत्या काळात इंजिनियरिंग आणि मेडिकलचा अभ्यासक्रम मराठीतून शिकवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. या माध्यमातून देशाच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल होणे अपेक्षित आहेत. देशात वर्षानुवर्षे शालेय शिक्षणणाचे 10-2 असे स्वरूप होते. मात्र नव्या धोरणाचे हे स्वरूप बदलण्यात आहे असून त्याऐवजी 5-3-3-4 अशी नवी व्यवस्था लागू होणार आहे. यात पूर्व प्राथमिकची तीन वर्षे नर्सरीपासून दुसरीपर्यंत अशी एकूण पाच वर्षे तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे वर्गीकरण तयार करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी करण्यासाठी सेमिस्टर पॅटर्न लागू करण्याचे सुचविण्यात आले आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आले असून महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार असल्याचे केसरकर म्हणाले.