
मुंबई ,09 मे 2023- सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई करत सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकावर कारवाई केली आहे. सीरमचे संचालक झेड. एस. पूनावाला यांच्या तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत. पनामा पेपर प्रकरणात झवरेह पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. या प्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील ४१.६४ कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. फेमा (FEMA) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
अंमलबजावणी संचालनालयाने FEMA च्या तरतुदींनुसार झवरेह सोली पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कारवाई करत वरळीतील सीजे हाऊस येथील ४१.६४ कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीकडून झवरेह सोली पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध FEMA च्या तरतुदींखाली लिबेरलाइज्ड रेमिटन्स स्कीमच्या (LRS) गैरवापराच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पनामा पेपर्समध्ये ऑफ-शोअर संस्थांसंदर्भातील खुलाशांमध्ये त्याचे नाव आढळून आल्याचे इडीने म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ईडीकडून केला जात आहे.