पावसाळ्यात कोकणात जाताय, परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका, पहिल्याच पावसात दगड कोसळले पहा सविस्तर….

Spread the love

रत्नागिरी : कोकणात पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला फटका बसला आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे. तर महत्त्वाच्या असलेल्या परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे दगड महामार्गावर काल शनिवारी खाली कोसळले होते. सुदैवाने एक गाडी याच्यातून बचावल्याची माहिती परशुराम घाट येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी या पावसातही परशुराम घाट धोकादायक ठरण्याची चिन्ह पहिल्याच पावसात दिसू लागली आहेत. इतकेच नव्हे तर या परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम असून “भय इथले संपत नाही…” अशीच या वर्षीचीही स्थिती आहे. दरम्यान, या ठिकाणी चिपळूण पोलीस उपविागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शनिवारी घटनास्थळी परिसराला भेट दिली. यावेळी, घाटात सुरक्षेचा उपाय म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सबंधित कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दगड हटवण्याचं काम कल्याण टोलवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलं. तसेच ज्या ठिकाणी दगड खाली आले होते तो भाग बंद करून नव्याने करण्यात आलेल्या एका लेनवरून सगळी वाहतूक काल शनिवारपासून सुरळीत सुरू करण्यात आली आहे. परशुराम घाटाच्या वाहतुकीसाठी पर्याय असलेला चिरणी – आमडस हा मार्गही वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.

सिमेंट काँक्रीटने बनवलेल्या महामार्गावर पहिल्याच पावसात वालोपे येथे खड्डा पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी महामार्गाच्या कामाच्या क्वालिटी बाबतही प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या परशुराम पेढे या गावाला दरडीचा धोका आजही कायम असून महामार्ग प्रशासन यांच्याकडे मागणी केल्यानुसार आजही सेफ्टी वॉल बांधण्यात आलेल्या नाहीत. दुर्गवाडी येथील तसेच परशुराम आणि पेढे परिसरातील जवळपास ६० ते ७० घरांना दरडींचा धोका कायम आहे, अशी प्रतिक्रिया परशुराम गावच्या सरपंच गायत्री जोगळे आणि उपसरपंच प्रणित गुरव यांनी दिली आहे.

परशुराम ग्रामपंचायतीचे सदस्य जयदीप जोशी यांनीही प्रशासनावर ताशेरे ओढत दरडीचा धोका ही नैसर्गिक आपत्ती नसल्याचे म्हटले आहे. पूर्वीपासून असलेल्या पायवाटा बंद झाल्या आहेत, नाल्यांची रचना बदलली आहे. त्यामुळे हा सगळा धोका वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिखल साचल्याने प्रांत कार्यालय आणि चिपळूण पंचायत समितीसमोर दुचाकी घसरून अपघात झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. रडत खडत गेले कित्येक वर्ष चालू असलेल्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे याचा त्रास वाहनचालक आणि अनेक नागरिकांना करावा लागत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page