
रायगड- दुर्गराज रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार साजरा केला जातोय. कालपासून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. गडपुजन, आई शिरकाई मातेची पुजा, गोंधळ, जगदिश्वराचा अभिषेक असे विधीवत शुभकार्य पार पडल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. विशेष म्हणजे यंदा हा ३५० सुवर्ण नाण्यांच्या वर्षावाने शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक पार पडणार आहे.
दरम्यान २००६ पासून कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे दुर्गराज रायगडावर ६ जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत.सुरूवातील फक्त तीनशे-साडेतीनशे शिवप्रेमींना सोबत घेऊन सुरू करण्यात आलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आता राज्यभरातून हजारो शिवप्रेंमी उपस्थिती लावतात.या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिवराज्याभिषेक समिती उत्तमरित्या नियोजन करत असते.यंदाही असेच नियोजन रायगडावर करण्यात आले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर वाजत-गाजत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल.हि मिरवणूक राजसदरेवरून,नगारखाना,होळी मैदान आणि तसेच पुढे जगदिश्वराचे मंदिर इथं पर्यंत काढण्यात येईल.या मिरवणूकीत लाठी-काठी, मैदानी खेळ, मल्लखांब, ढोल-पथके, लेझीम पथके असे सर्व जण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतात.असा हा सोहळा दैदिप्यमानपणे यंदा रायगडावर साजरा होत आहे.