नेरळ: सुमित क्षीरसागर
नेरळ संकुल विकास प्राधिकरणात ४ गावांचा समावेश असून शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी विकास प्राधिकरणाची आहे. मात्र प्राधिकरण सुस्त असल्याने कोल्हारे भागात यंदा पुन्हा पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरपंच महेश विरले यांनी तत्परता दाखवली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या संरक्षण भिंती ग्रामपंचायतीकडून तोडून पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले नेरळ हे शहरीकरणाकडे झुकले आहे. त्यामुळे परिसरात देखील नागरिकीकरण वाढले आहे. तेव्हा येथील विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा यासाठी २००७ मध्ये नगररचना विभागाच्या अखत्यारीत नेरळ संकुल विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
यामध्ये नेरळ, कोल्हारे, ममदापुर ग्रामपंचायतीमधील नेरळ, ममदापुर, धामोते, बोपेले या चार गावांचा समावेश करण्यात आला होता. प्राधिकरण हद्दीत बांधकाम करणाऱ्या विकासकांकडून विकास कर वसूल केला जातो. या करातून प्राधिकरण हद्दीत सोयी, सुविधा, नियोजनबद्ध विकास प्राधिकरणाची जबाबदारी आहे.
मात्र सध्या बांधकाम व्यावसायिक स्वतःच्या मर्जीने बांधकाम करत असल्याचे चित्र आहे. अनेकदा नैसर्गिक नाले बंद करून बांधकाम केले जाते. याचा परिणाम गेले काही वर्ष नेरळ कळंब राज्यमार्ग पाण्याखाली जात होता. तर यंदा २४ जूनपासून सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे धामोते येथील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले होते. बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या संरक्षण भिंती, नैसर्गिक नाल्यांचा वळवलेला मूळ प्रवाह हे मूळ कारण होते.
सन्नी होम, मॉर्निंग सोसायटीच्या मागील भाग, विवियाना सोसायटी, निर्माण बंगलो आदी भागात पाणी साठले होते. तेव्हा याबाबत स्थानिकांनी याबाबत सरपंच महेश विरले यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पाऊस असाच पडत राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होईल यामुळे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी तात्काळ जेसीबीच्या साहाय्याने तुंबलेल्या पाण्याचा वाट मोकळी केली आहे. तर ग्रामपंचायतीची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी केव्हाही संपर्क केल्यास आम्ही तात्काळ मदत करू असे सरपंच महेश विरले यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
यावेळी माजी उपसरपंच रोशन म्हसकर, सामाजिक कार्यकर्ते पपेश विरले, भरत पेरणे, सोमनाथ विरले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.