
*चिपळूण :* सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिले न मिळाल्याने एका अभियंता ठेकेदाराने आत्महत्या केल्यानंतर, त्या घटनेचे पडसाद कोकणातही उमटू लागले आहेत. चिपळूण तालुक्यातील ठेकेदारही आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील सर्व पाणी योजनांची बिले मिळेपर्यंत काम थांबवण्यात येतील, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.
गुरुवारी सायंकाळी जलजीवन मिशन कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी दशरथ दाभोळकर, आर. जी. कुलकर्णी, संतोष जाधव, राजेश सुतार, योगेश सुतार, तुषार चव्हाण आदींनी ग्रामविकास व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शैलेश बुटाला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी थकीत बिले, आर्थिक अडचणी आणि कामकाजावरील ताण यासंदर्भात आपली व्यथा मांडली. आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका, असा संतप्त सवाल करत त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही बिले न मिळाल्याचा आरोप केला. बँकांकडून काढलेले कर्ज, त्यावरील वाढणारे व्याज आणि प्रशासनाकडून मिळणारी असंवेदनशील वागणूक यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुमारे 1200 कोटींच्या पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे. मात्र गेल्या दीड वर्षात केवळ 15 ते 20 टक्के निधी वितरित करण्यात आला . उर्वरित देयकांअभावी अनेक कामे अर्धवट पडली आहेत. यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले असून अनेकांची घडी विस्कटली आहे. सांगलीतील आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण ठेकेदार वर्गात अस्वस्थता निर्माण केली आहे. ज्याच्या कडून काम करून घेतले, त्याला वेळेवर पैसे न दिल्यामुळे त्याला जीवन संपवण्याची वेळ आली. आता आम्हालाही तशीच वेळ येणार का? असा जळजळीत सवाल या ठेकेदारांनी उपस्थित केला. शासनाने तातडीने थकीत बिले वितरीत करून कामांची गती आणि ठेकेदारांचा विश्वास परत मिळवणे आवश्यक आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर