लोकसभा निवडणूक जागावाटपामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. टीका-टिपण्णी केली जात आहे. तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांना तिकिट मिळत नसल्यामुळं पक्षांतर्गतच नाराजी वाढत असून, नेते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश नेते ऐकत नसल्यामुळं पक्षांतर्गतच डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे. पक्षातील या नेत्यांना कसे शांत करायचं? त्यांची समजूत कशी काढायची? त्यांची मनधरणी कशी करायची? आदी आव्हानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आहेत. या सर्वामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे का? पाहूयात काय आहेत कारणे.
मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यात सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या जागेवर महायुतीमधून सुनेत्रा पवार किंवा महादेव जानकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते विजय शिवतारे हे अपक्ष लढवण्यावर ठाम आहेत. कारण इथे अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात मागील काही महिन्यांपासून राजकीय शत्रुत्व आहे. या दोघांनीही ऐकमेकांवर बोचरी टीका केली आहे. त्यामुळं येथे अजित पवार पक्षातून कोणीही उमेदवार दिला तरी, आपण त्याचा पराभव करण्यासाठी काम करू, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसंच, मला जरी पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तरी आपण अपक्ष निवडणूक लढवणार आहोत. तसंच पक्षाने जरी कारवाई केली तरी आपण कारवाईला सामोरे जाण्यासही तयार असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवतारेंनी एकनाथ शिंदेंची दोन वेळ भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. युती धर्म पाळण्याचा सल्ला दिला. मात्र, विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी शिवतारेंच्या या वेगळ्या भूमिकेमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.
आनंदराव अडसूळ बंडाच्या भूमिकेत? दुसरीकडे अमरावती लोकसभा …
मतदारसंघामध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनीही वेगळी भूमिका घेतल्यामुळे शिवसेना (शिंदे गटात) पक्षाचा आदेश कोणी मानत नसल्याचं दिसत आहे. अमरावतीच्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, येथे शिवसेनेचा अनेक वर्ष खासदार होता. ही शिवसेनेची जागा आहे. त्यामुळं ही जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे, असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे. तसंच, जरी नवनीत राणा यांना येथे उमेदवारी मिळाली तरी आपण त्यांचा प्रचार करणार नाही. योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ हे बंडाची भूमिका घेऊ शकतात, असंही राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
हेमंत गोडसे का आहेत नाराज?…
शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे नाशिकमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसे यांनी जाहीर केली होती. श्रीकांत शिंदेंच्या या घोषणेनंतर भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. शिंदे यांना परस्पर नाशिकची उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ह्या जागेवर महायुतीतील भाजपाने दावा केला आहे. त्यामुळे हेमंत गोडसे हे नाराज असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा भेट घेतली आहे. तसंच, ते आता दिल्ली दरबारीही जाणार असल्याचं समजतं.
पक्षातील नेते आपल्या आदेश मानत नसल्याची चर्चा…
तिकिट न मिळल्यास हेमंत गोडसे हे वेगळी भूमिका घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यासमोर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यामुळं त्यांची मनधरणी कशी करायची हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आहे. मूळ शिवसेनेतून बंड केल्यानंतर दीड वर्षातच पक्षातील नेते आपल्या आदेश मानत नसल्यामुळं आणि नेते वेगळी भूमिका घेत असल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली असून, या नेत्यांची समजूत काढण्यास. त्यांची मनधरणी करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरतील, की त्यांना यामध्ये अपयश येईल. अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
13 पेक्षा कमीच जागा मिळण्याची शक्यता…
महायुतीची उमेदवारांची अंतिम यादी अद्यापपर्यंत आलेली नाही. आज (बुधवार) किंवा उद्या (गुरुवार) अंतिम यादी येईल. शिवसेनेची (शिंदे गट) देखील अंतिम यादी येईल, असं शिवसेना प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं आहे. तसंच, सध्या आमच्याकडे तेरा खासदार आहेत, आणि आम्हाला एवढ्याच जागा मिळव्यात अशी आमची मागणी आहे. परंतु ते 13 खासदार निवडून येतील अशी सध्या महाराष्ट्रात परिस्थिती नाहीय, जे सर्वे समोर आलेत त्यामध्येही शिंदे गटाला कमी जागा मिळताहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे गटाने जरी 13 जागांचा दावा केला असला तरी, त्यांना 13 जागा मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि विश्लेषकांनी म्हटलं आहे.