दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून १ एप्रिलपासून वाहनांना बंदी; वाहतूक मार्गात बदल

Spread the love

ठाणे: प्रतिनिधी मुंब्रा बाह्यवळण (बायपास) रेतीबंदर जवळील रस्त्याच्या (प्ररामा ४) दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जे. एन. पी. टी./कळंबोलीकडून भिवंडी/नाशिक/गुजरात व उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुंब्रा बायपास बाह्यवळण रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याने या मार्गावरून येणारी जाणारी वाहतूक बाधित होणार आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत १ एप्रिलपासून बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी कळविले आहे.

पोलीस आयुक्त श्री. सिंह यांनी काढलेल्या सूचनेत म्हटले आहे की, ठाणे शहर अंतर्गत परिसरातून राज्यांतर्गत व बाहेरील राज्यातून मुंब्रा बायपास मार्गे जे.एन.पी.टी. / कळंबोली नवी मुंबईकडून भिवंडी/नाशिक/ गुजरातकडे राज्य महामार्ग क्र. ३ अथवा घोडबंदर रोडने जड- अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मुंब्रा बायपास रेतीबंदर जवळील मुंब्रा कौसा बाह्यवळण रस्ता प्र.रा.मा-४ १३९/२०० ते १३९/८१० मधील रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती व पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटचा ओव्हरले करण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच खारेगाव व साकेत पुलाचे मास्टीक पध्दतीने डांबरीकरण व क्षतिग्रस्त एक्सपांशन जॉईंट्स दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

प्रवेश बंद : जे.एन.पी.टी./कळंबोली, नवी मुंबई कडून येणारी वाहने तसेच दक्षिण भारतातून पुणे मार्गे तळोजा कडून कल्याण फाटा व शिळफाटा मुंब्रा बायपास मार्गे नाशिक गुजरात, भिवंडी, उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुंब्रा बायपासकडे जाण्यास शिळफाटा येथून पूर्णवेळ प्रतिबंध करण्यात आला आहे. नवी मुंबईतील जे.एन.पी.टी./कळंबोली, उरण मार्गे महापे सर्कलकडून शिळफाटा मार्गे गुजरात भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिळफाटाकडे येण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग: कळंबोली – शिळफाटा येथून डावे वळण घेवून – महापे हॉटेल पार्टीका सरोवर – समोरून वळण घेवून रबाळे एम.आय.डी.सी. मार्गे रबाळे नाका – ऐरोली पटणी सर्कल- डावीकडे वळून घेवून ऐरोली सर्कल उजवीकडे वळण घेवून मुलुंड ऐरोली ब्रिज वरून ऐरोली टोलनाका मार्गे उजवीकडे वळण घेवून – पूर्व द्रुतगती महामार्गे मुलुंड आनंदनगर टोलनाका – माजीवाडा – घोडबंदर रोडने – गायमुख मार्गे गुजरात दिशेने मार्गस्थ होतील.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page