
जळगाव :- खारघर मधील घटना ताजी असतानाच उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेल्याची बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यात असलेल्या वडगाव बुद्रुक येथील तेरा वर्षीय भावेश बाळू पाटील या शालेय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
गुरूवारी (काल) दिवसभर शेतात काम केल्यानंतर भावेशला रात्री उन्हाचा त्रास जाणवू लागला. सकाळी उलटी व जुलाब झाल्याने त्याला दवाखान्यात नेत असताना त्याचे वाटेतच निधन झाले. चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत असे घोषित केले. भावेश पाटील हा शिरपूर येथे शिकत होता सुट्टी निमित्त गावी आला होता. भावेशच्या वडीलांचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तो एकटा आईसोबत राहत होता. अशी माहिती भावेशच्या नातेवाईकांनी दिली आहे.
उन्हाच्या चटके आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.अशात सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे.पाणी जास्त पित राहणं, शिळे अन्न टाळणं, गरज नसल्यास उन्हाच्या संपर्कात न येणं हे उष्माघातापासून वाचण्याचे उपाय आहेत.काळजी घ्या आणि आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.