
नाशिक, : जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि नागरिकांच्या हाताला काम या त्रिसूत्रीचे कालबद्ध नियोजन करण्यात यावे. अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, सुहास कांदे, सरोज अहिरे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उप वनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उप वनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपायुक्त पशुसंवर्धन गिरीश पाटील, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.