रत्नागिरी जिल्ह्यात ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू ; पहा सविस्तर

Spread the love

रत्नागिरी : जिल्ह्यातील कनकादित्य मंदिर, श्री महाकाली मंदिरासह प्रमुख ४७ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी ही माहिती येथे पत्रकार परिषदेत दिली.

येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २०२० साली राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे प्रयत्न सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात ११ बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील ४७ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिराचे पावित्र्यरक्षण आणि भारतीय संस्कृती यांचे पालन व्हावे, या उद्देशाने मंदिरामध्ये भाविकांनी येताना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नये, तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. घनवट यांनी केले. तसे फलक जिल्ह्यातील २० मंदिरांच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापुरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशिविश्वेश्वर देवस्थान, नाचणे येथील ग्रामदैवत श्री नवलाई देवी मंदिर, पावस येथील श्रीराम मंदिर, चिपळूणचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री जुना कालभैरव मंदिर, श्री विंध्यवासिनी मंदिर, मजरे – दादर (दसपटी) येथील श्री रामवरदायिनी मंदिर आदींसह जिल्ह्यातील ४७ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री. घनवट म्हणाले, यापूर्वी जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ मध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता. त्याची कार्यवाही राज्यातील मंदिरांमध्ये करण्यात येत आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्र प्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस आणि सी कॅथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले कपडे, तसेच स्लीपर वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे व्यक्तिस्वातंत्र्य असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तिस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पाश्चात्त्यांच्या तुलनेत पारंपरिक वस्त्रनिर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, असेही श्री. घनवट यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला सनातनचे संत सद्गुरू सत्यवान कदम आणि जिल्ह्यातील विविध मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.

जाहिरात

त्रिमुखी देवी श्री वरदान मानाई त्रेवार्षिक समायात्रा २०२४- महोत्सव लवकरच…

दिनांक २३ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४
स्थळ – मंदीर परिसर , दहिवली बु. ता. चिपळूण, जि. रत्नागिरी अवश्य भेट द्या! आणि आईचा आशिर्वाद घेऊया

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page