
मंडणगड /प्रतिनिधी : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेच्या वतीने डॉ. वाल्मिक दगडू परहर यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपप्राचार्य म्हणून डॉ. विष्णु सर्जेराव जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. वाल्मिक परहर यांनी ‘प्रभारी प्राचार्य’ पदाचा कार्यभार स्वीकारुन आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, प्राचार्य डॉ. राहूल जाधव, डॉ. विष्णु जायभाये, ग्रंथपाल दगडू जगताप हे उपस्थित होते. नियमित प्राचार्य डॉ. राहूल जाधव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांनी आपल्या प्राचार्य पदाचा कार्यभार नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांचेकडे दिला आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. राहूल जाधव व वाणिज्य विषयाचे सहायक प्राध्यापक डॉ. रामदास देवरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेबाबत संस्था व महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच डॉ. वाल्मिक परहर यांची प्रभारी प्राचार्य पदी तर डॉ. विष्णु जायभाये यांची उपप्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
डॉ. वाल्मिक परहर हे याच महाविद्यालयात कार्यरत असून त्यांनी उपप्रचार्य म्हणून गेली अनेक वर्ष काम पाहिलेले आहे. त्यांचा ‘अर्थशास्त्र’ हा विषय आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे अनेक संशोधन लेख प्रसिध्द झाले आहेत. त्याचबरोबर त्यांना उपप्राचार्य कामाचा चांगला अनुभव आहे. परिक्षा विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी उत्तमपणे काम पाहिले आहे.
उपप्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेले डॉ. विष्णु सर्जेराव जायभाये हे याच महाविद्यालयात ‘भूगोल, पर्यावरणशास्त्रासह एफ.सी.’ या विषयाचे सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधी उपप्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. डॉ.वाल्मिक परहर व डॉ. विष्णु जायभाये यांची प्रभारी प्राचार्य व उपप्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, अध्यक्षा सौ. सपंदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, सर्व संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.