भारतात धर्माच्या नावाखाली अधर्म चालणार नाही : डॉ.मोहन भागवत…

Spread the love

पुणे :- वर्चस्ववादाचा विसर पडून सर्वसमावेशकता स्वीकारणे ही आपली संस्कृती आहे. संस्कृतीची जोपासना करण्यासाठी संघटित व्हा, सशक्त व्हा. मात्र, कोणालाही भीती दाखवू नका. आपले राष्ट्र धर्माधारित असून, इथे विविधतेत एकतेचा श्रृंगार आहे. एकता मोडीत काढण्याचा प्रयत्न इथे सफल होणार नाही. धर्माच्या नावाखाली अधर्म चालणार नाही, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला. भारत पुढील २० वर्षांत विश्वगुरू होईल, असे भाकितही त्यांनी केले.
सहजीवन व्याख्यानमालेमध्ये डॉ. मोहन भागवत यांनी विश्वगुरू भारत या विषयावर मार्गदर्शन केले. सहकारनगरमधील फुलोरा मैदान येथे कार्यक्रम पार पडला. या वेळी सहजीवन व्याख्यानमालेचे आयोजक विनय कुलकर्णी आणि ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे संचालक डॉ. अनंत भागवत उपस्थित होते. या वेळी श्रीनगरमध्ये क्रेन लावून तिरंगा फडकवणारा साजिद युसूफ या तरुणाचा आणि सामरिन खान या देशातील सर्वात तरुण सरपंच महिलेचा सन्मान करण्यात आला.


डॉ. भागवत म्हणाले, जगातील युद्ध अद्याप थांबलेले नाही. कट्टरतेपोटी हिंसा सुरू आहे. पर्यावरण हास होत आहे. सगळे जग सुखी होऊ शकत नाही, हे खरे असले तरी जास्तीत जास्त लोकांना सुखी होता यायला हवे. परंतु, सध्या तशी परिस्थिती नाही. जगातील ४ टक्के लोकसंख्या ८० टक्के संसाधने वापरत आहे आणि इतरांवर अन्याय होत आहे. मोजके उद्योगपती आपल्या हातात संसाधने एकवटण्यासाठी प्रयत्न करतात. जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. एकीकडे एक उजळ, गौरवास्पद बाजू आहे तर दुसरीकडे मानवतेच्या विनाशाची शंका निर्माण करणारी बाजू निर्माण झाली आहे.


भागवत म्हणाले ,भौतिक प्रगतीची भारताकडे क्षमता आहे. तरुण पिढी निर्धाराने काम करते आहे. त्यामुळे आपण प्रगती करत आहोत. भारताकडे अढळ नीती, उद्योजकता, बुद्धी, संस्कार आणि संस्कृती आहे. सनातन काळापासून प्राप्त झालेले आध्यात्मिक ज्ञान ही आपली शाश्वत परंपरा. आपल्याकडे ज्ञाननिधी आहे आणि त्याचा वापर जगासाठी करता यायला हवा.


आपल्याकडे देशाचे संविधान सर्वोच्च आहे. संविधानातील प्रस्तावना, मार्गदर्शक तत्त्वे, कर्तव्य आणि अधिकार यांचे घरोघरी प्रबोधन झाले पाहिजे. त्यानुसार आचरण केले पाहिजे.


प्रत्येकाच्या पूजा, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी कट्टरता संपली पाहिजे. आमचे खरे आणि इतरांचे चूक असे चालणार नाही. आपली श्रद्धा महत्त्वाची, तितकीच दुसऱ्याचीही महत्त्वाची हे स्वतःला सातत्याने बजावले पाहिजे. इतर धर्माच्या देव-देवतांची हेटाळणी, मतांतरण आमच्या देशात चालणार नाही.
भूतकाळाच्या ओझ्याखाली अतिरेकी तिरस्कार, द्वेष यापोटी रोज एक नवीन प्रकरण उकरून काढणे चालणार नाही. आपला देश संविधानानुसार चालतो आणि सर्वांनी त्याचा आदर करायला हवा. जुनी भांडणे विसरून आपण सर्वांना सामावून घेतले पाहिजे. आपल्याकडे सर्वसमावेशकतेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न पूर्वीपासून सुरू आहे. तो सफल होणार नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page