एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई- अजित पवार लवकर पहाटे काम चालू करतात. मी उशिरापर्यंत काम करतो. देवेंद्र फडणवीस हे ऑलराउंडर आहेत. बॅटिंग आणि बॉलिंग करतात, विकेट काढतात, चौकार आणि षटकार मारतात, फिल्डिंगही चांगली लावतात. त्यामुळे कोणालाही तक्रार करायला संधी मिळणार नाही, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“काही ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी कमी झाला आहे. पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. निसर्गाचा लहरीपणा सुरु आहे. उत्तरेकडे महापूर आहे, तर आपल्याकडं पाऊस कमी आहे. पण, सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल,” अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
“दररोज माध्यमांत दाखवलं जातं की, सरकार पडेल, जाईल. एक वर्षापूर्वी सरकार स्थापन झालं आहे. तेव्हापासून सरकार पडेल-पडेल असं बोललं गेलं. पण, सरकार अधिक-अधिक मजबूत होत गेलं. आता सरकार पडेल असं बोलू नका, नाहीतर आणखी काहीतरी होईल,” असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे.