⚛️सचिन तेंडुलकरला नुसत्या शुभेच्छा देऊ नका, त्याच्याकडून शिका ‘या’ गोष्टी

Spread the love

⏩️क्रिकेटच्या देवाने आज जीवनाचे अर्धशतक पूर्ण केले आहे. शारजाच्या वाळवंटात ऑस्ट्रेलियाची धुलाई करून क्रिकेटच्या मैदानात वादळ निर्माण करणाऱ्या सचिन तेंडुलकरवर आज शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सर्वसामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण सचिनकडून प्रेरणा घेतो आहे.

⏩️उत्तम खेळाडू अनेक होऊन गेले. पण सर्वोत्तम खेळाडूसह उत्तम माणूस होण्यासाठी प्रयत्नशील राहिला तो सचिन.‌ त्यामुळे सचिनच्या जीवनातून आपण अनेक धडे घेऊ शकतो.

▶️१. सतत शिकण्याची इच्छा

सचिन तेंडुलकरचे नेत्रदीपक यश सगळ्यांना दिसते. पण त्यासाठी त्याने घेतलेली अविरत मेहनत लक्षात येत नाही. नावलौकिक मिळाल्यावर त्याने शिकणे थांबवले नाही. तो सतत नवीन गोष्टी शिकत राहिला.‌ आजूबाजूला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचा अभ्यासपूर्ण निरीक्षण करत राहिला.

▶️२. नियमितता
एका मागून एक कोट्यवधी रुपयांचे करार करून अल्पावधीत श्रीमंत झालेला क्रिकेटपटू म्हणजे सचिन. पण पैशांसह कोट्यधीश चाहत्यांच्या ह्रदयाचा ताबा घेणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी प्रत्येक दिवशी त्याने न थकता, न कंटाळता मेहनत केली आहे.‌ २००७ मध्ये वर्ल्ड कपमधला भारतीय संघाचा परफॉर्मन्स निराशाजनक होता. पण म्हणून त्याने प्रयत्न करणे थांबवले नाही. तो संघासोबत नियमित मेहनत करत राहिला. २०११ ला भारतीय संघाने वर्ल्ड कप उचलला तो त्याच मेहनतीच्या बळावर.

▶️३. नम्रता
पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, झिम्बाब्वे या देशांच्या गोलंदाजांची धुलाई करत क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर. पण इतके घवघवीत यश मिळूनही त्याला अहंकाराचा वारा लागला नाही. खरेतर सचिन म्हणजे नम्रता असे म्हणायला हवे.

“प्लेइंग इट माय वे” या आत्मचरित्रात सचिन तेंडुलकरने वडिलांचे शब्द लिहिले आहेत. त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणी सांगितले होते की, “जर तू नम्र राहिलास तर तुझा खेळ संपल्यावर सुद्धा लोक तुला प्रेम आणि सन्मान देतील.” ते म्हणाले होते की, सचिन “एक उत्तम खेळाडू आहे” या पेक्षा “सचिन एक उत्तम माणूस आहे”, हे ऐकायला त्यांना जास्त आवडेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page