भारतात iPhone बनवू नका; ट्रम्प यांच्या ‘ॲपल’ला सूचना, भारताकडून हालचालींना वेग…

Spread the love

भारतात iPhone बनवू नका, भारतातील ‘ॲपल’चं उत्पादन गुंडाळा, अशा सूचना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना दिल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. त्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. भारतानेही याबाबत पाऊल उचललं आहे.

भारतात iPhone बनवू नका; ट्रम्प यांच्या ‘ॲपल’ला सूचना, भारताकडून हालचालींना वेग…

नवी दिल्ली/ प्रतिनिधी- ‘ॲपल’ने आपल्या स्मार्टफोनचं भारतातील उत्पादन थांबवावं आणि ते अमेरिकेत सुरू करावं, अशी सूचना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना केल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. तर दुसरीकडे ट्रम्प यांचा हा दावा केंद्र सरकारच्या सूत्रांनी खोडून काढला आहे. ‘ॲपल’ने भारतातील गुंतवणूक कमी करणार नसल्याची हमी दिल्याचा दावा केंद्र सरकारच्या सूत्रांनी केला. ट्रम्प सध्या पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी कतारची राजधानी दोहा इथं माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी संवाद साधताना विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले, “मी ‘ॲपल’चे मुख्याधिकारी टिम कूक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती करण्याऐवजी अमेरिकेत करावी, अशी सूचना मी केली आहे. टिम हे माझे मित्र आहेत. त्यांना मी नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. परंतु ते आता भारतात निर्मिती क्षमता वाढवत असल्याचं समोर येत आहे. भारत स्वत:ची काळजी घेऊ शकतो. माझ्या सूचनेनंतर आता अमेरिकेतील निर्मिती क्षमता वाढवली जाणार आहे.”

ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर नवी दिल्लीत हालचालींना वेग आला. सरकारकडून तातडीने ‘ॲपल’ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचं समजतंय. त्यानंतर भारतातील गुंतवणुकीची योजना कायम असून देशात मोठी निर्मिती सुविधा उभारण्याचा प्रस्ताव असल्याची हमी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘ॲपल’ने चीनमधील उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला असून हा व्यवसाय भारताकडे वळत आहे. असं असताना ट्रम्प यांच्यामुळे ‘ॲपल’ने भारतातील उत्पादन घटवलं, तर त्याचा मोठा फटका उत्पादन क्षेत्राला बसू शकतो. दरम्यान याबाबत वृत्तसंस्थेनं ‘ॲपल’कडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

‘ॲपल’ चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आयफोन बनवत होतं. पण आता ते चीनपासून स्वत:ला दूर ठेवू इच्छित आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात ‘ॲपल’ला सर्वांत मोठा धक्का बसला होता. त्यांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफचा भार लादला. चीननेही त्याच्या उत्तरात टॅरिफ वाढवले. या टॅरिफ वॉरमध्ये ‘ॲपल’ कंपनी अडकली आणि त्यांनी चीनला सोडण्याचा निर्णय केला. त्यानंतर ते आता भारतात जमिनीच्या शोधात आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page