
मुंबई- मुंबईलगतच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात पांढऱ्या पाकिटातून मतदारांना पाचशेच्या 6 नोटा म्हणजे एकूण 3 हजार रुपये दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. निवडणुकीला अवघे काही तास उरल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला असताना विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप केला आहे. मनसे नेते राजू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवारांना पांढऱ्या पाकिटात पाचशेच्या नोटा मिळाल्याचे दिसून येत आहे. महिला स्वतःहून त्यांना मिळालेली पांढरी पाकिटे फोडून दाखवत आहेत. त्यात 500 च्या 6 नोटा दिसत आहेत. त्यांच्या हातात भाजपचे पाम्पलेटही दिसून येत आहे.
डोंबिवलीत पैसा अन् गुंडगिरीचा वापर – मनसे…
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाचे गांधी प्रेम. सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट 3000/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट 5000/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे. सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे.
भ्रष्टाचाराच्या नोटांना पाय फुटले – रोहित पवार..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हा पैसा भ्रष्टाचार व कमिशनचा असल्याचा दावा करत भाजपवर निशाणा साधला आहे. corruption आणि commission च्या नोटांना पाय फुटायला सुरवात झाली. पण हे फक्त निवडणुकीपुरतंच दिसेल, नंतर पाच वर्षे कुणी ढुंकूनही बघणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आत्ता पाहू काय म्हणाले शिंदे गटाचे उमेदवार?…
शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील याविषयी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हणाले की, गत महिन्यापासून मी भाजपची सर्व पोलखोल केली आहे. त्यामुळे भाजपला जिंकण्यासाठी असे नको ते धंदे करावे लागत आहेत. भाजप कार्यकर्ते दशरथ भवनमध्ये पैसे वाटत होते. त्यांनी पाकिटातून 3 हजार रुपये दिले. भाजपचे बिनविरोध निवडून आलेले विषू पेंडणेकर यांचे कार्यकर्ते मतदारांना पैशांची पाकिटे वाटत होते. ते प्रत्येकाच्या घरात पाकिटे नेऊन टाकतात. ते आम्हाला सरळ मार्गाने हरवू शकत नाहीत. त्यामुळे असे धंदे करत आहेत, असे ते म्हणाले.
भाजपने काय दिले स्पष्टीकरण?…
डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती आहे. पण प्रभाग क्रमांक 29 मध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. येथील शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनीही भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. पण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाचा आरोप खोट आहे. आमचे कार्यकर्ते त्या भागात पत्रके वाटण्यास गेले होते. त्यांच्या खिशात पैसे कोंबून त्यांना मारहाण करण्यात आली. आम्ही ही दादागिरी, दडपशाही खपवून घेणार नाही, असे ते म्हणालेत.
प्रभाग क्रमांक 29 मध्ये कुणामध्ये सुरू आहे लढत?..
कल्याम डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 अ मधून भाजपच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेचे रवी पाटील उभे टाकले आहेत. सध्या सर्वच उमेदवारांचा प्रचार टोकाला पोहोचला आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर