भडकंबा येथील केदारलिंग दूध संस्थेमार्फत दूध उत्पादकांना दिवाळी निमित्त भरघोस बोनस, मिठाई, भेटवस्तू व भाजी बियाणांचे वाटप…

Spread the love

जनशक्तीचा दबाव/ साखरपा-
संंगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील श्री. केदारलिंग दूध उत्पादक सहकारी संस्थेमार्फत दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त भरघोस बोनस, मिठाई, भेटवस्तू व भाजी बियाणांचे वाटप करण्यात आले.

भडकंबा येथील दूध उत्पादक शेतकरी सन 2015 मध्ये एकत्र आले. भडकंबा गावचे सुपुत्र व शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते प्रशांत उर्फ बापू शिंदे, कार्यकर्ते मिलिंद शिंदे, बावाशेठ भोसले, संतोष डिगे, आबा कानिटकर, लवू पवार, सुरेश शिंदे, अतुल शिंदे, अजय रसाळ, संतोष लाड यांनी गावातील सर्व शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना एकत्र करून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या गोकुळ संस्थेची स्थापना केली. सदर संस्था सुरू करणेपूर्वी शासकीय दूध संस्थेमार्फत दूध संकलन केले जात होते आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना 16 रुपये इतका अल्प दर मिळत होता. पहिल्याच दिवशी दूध उत्पादकांना 25 रु.प्रमाणे दर देण्याचे काम या संस्थेने केले. आणि आज गाईच्या दूध उत्पादकांना 38 ते 40 रु.पर्यंत व म्हशीच्या दुधाला 55 ते 60 रु.इतका दर दिला जातो.

खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची तारणहार म्हणून भडकंबा येथील केदारलिंग दूध संस्थेची गणना केली जाते. केदारलिंग दूध संस्थेच्या स्थापनेनंतर देवडे, किरबेट, भोवडे, कोंडगाव, कनकाडी, मुर्शी, साखरपा, खडीकोळवण, दाभोळे, देवळे, चाफवली, मेघी, मोर्डे तसेच लांजा पूर्व भागातील सुमारे 28 व देवरूख संगमेश्वर भागातील 25 दूध संस्था गोकुळ व वारणा दूध संघाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्या संगमेश्वर व लांजा तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर गावांमध्ये दर दहा दिवसांनी दूध गंगेच्या माध्यमातून 20 ते 25 लाख रुपये येत आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या भागात आर्थिक प्रगती या सर्व दूध संस्थेच्या माध्यमातून होत आहे. गावातील ग्राहकांना देखील योग्य भावात उत्तम प्रतीचे व गाय व म्हैशीचे निर्भेळ दूध या निमित्ताने उपलब्ध होत आहे.

भविष्यात तरुण या व्यवसायाकडे वळले तर नक्कीच पुणे मुंबई व अन्य शहराकडे जाण्याची वेळ येणार नाही. आज दिवाळीच्या निमित्ताने भडकंबा गावातील केदारलिंग दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना दिवाळी बोनस, मिठाई, भेटवस्तू व विविध भाजी बियाणांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थापक प्रशांत उर्फ बापू शिंदे, शाखाप्रमुख शेखर आकटे, सरपंच सौ. प्रतीक्षा नवाले, चेअरमन सौ. अनुष्का शिंदे, माजी सरपंच सौ. प्रांजल शिंदे, मिलिंद शिंदे, बावाशेठ भोसले, चंद्रकांत कनवजे, बाबी डिगे, सौ. ममता कनवजे, अतुल शिर्के, सौ. वरदा कानिटकर, सदू कांबळे, नंदू कनवजे, बबन दुधाणे, राहुल कांबळे, विलास कांबळे, राकेश शिंदे, बबन कनवजे, बाबुली कनवजे, मंगेश शिंदे, जगदीश कनवजे, गंगाराम शिंदे यांचेसह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page