
देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील स्व. आबासाहेब व कमलाबाई सरदेशपांडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, उपक्रमातील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात ‘आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी पुरस्कार निवडीचा निकष स्पष्ट करताना सांगितले की, अलीकडे वाचन हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे. या वास्तवाचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी तसेच ग्रंथालय सेवा सुविधांचा अधिकाधिक वापर व्हावा या हेतूने ग्रंथालयाकडून काही निकषांच्या आधारे ‘आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कारा’साठी निवड केली जाते. यासाठी विद्यार्थ्यानी संपूर्ण वर्षभरात अभ्यासक्रमा व्यतिरिक्त वाचलेली एकूण अवांतर पुस्तके व त्यांचे पुस्तक परीक्षण, यासह ग्रंथालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमामध्ये त्यांचा असणारा सक्रिय सहभाग, मिळविलेले प्राविण्य व त्यांचे एकूणच ग्रंथालयाप्रती समर्पण गृहीत धरून हा पुरस्कार दिला जातो.
महाविद्यालयातील बक्षीस व पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता कला विभागातील शुभम महेश चाळके व विज्ञान विभागातील सिद्धी श्रेणिक उपाध्ये हे विद्यार्थी मानकरी ठरले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील आदर्श ग्रंथालय वापरकर्ता शिक्षक म्हणून मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा शिरीष फाटक यांना, तर विद्यार्थ्यांमध्ये बी.व्होक- सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभागातील चेतन लक्ष्मण नाईक, व वाणिज्य विभागातील प्रगती संजय शिंदे हे मानकरी ठरले. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या पुस्तक परीक्षण स्पर्धेतील विजेते विद्यार्थी १. सायली राजेंद्र महाडीक- एम. एस्सी. (भौतिकशास्त्र)- प्रथम, २. प्रगती संजय शिंदे- प्रथम वर्ष, वाणिज्य- द्वितीय, ३. गौरी महेंद्र सागवेकर- ११वी कला- तृतीय, ४. श्रुती महेंद्र सागवेकर- ११वी कला- तृतीय, ५. पायल बाब्या वरक- द्वितीय वर्ष बीव्होक- बँकिंग अँड फायनान्स- उत्तेजनार्थ.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व समता पर्व अभियानाअंतर्गत आयोजित ‘सलग १२ तास वाचन उपक्रमातील’ सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी बक्षीस पात्र विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना जीवनातील वाचनाचे महत्त्व, कोणते वाचन करावे, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्यात, वाचन-मनन-चिंतन या त्रिसूत्रीचे जीवनातील महत्त्व सविस्तर विशद केले. ग्रंथपाल प्रा. मायंगडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाकरीता प्रसिद्धी विभाग समन्वयक प्रा. धनंजय दळवी व ग्रंथालय सहाय्यक रोशन गोरूले यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रंथालय विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष पाठक, ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी कौतुक केले.