
नाशिक : जिल्ह्यातील कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या अजमीर सौंदाणे येथील निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षकाने सहा विद्यार्थिनीं सोबत अश्लील वर्तन केल्याचे विशाखा समितीच्या चौकशीत समोर आले आहे. चौकशीत ही बाब उघड झाल्यानंतर संबंधित शिक्षकाला विभागाने निलंबित केले असून, मुख्याध्यापयांना ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे आदिवासी विभागातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

अजमीर सौंदाणे येथील निवासी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थीनींशी असभ्य वर्तन केले जात होते. शिकविण्याच्या बहाण्याने हा शिक्षक विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करायचा. यासंदर्भात मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानतंरही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी एका संघटनेच्या माध्यमातून संबधित शिक्षकाची थेट आदिवासी आयुक्तालयात तक्रार केली. त्यामुळे विभागाने विशाखा समिती नियुक्त करीत, चौकशी केली. समितीने विद्यार्थिनींशी चर्चा केल्यानंतर शिक्षका बाबत असलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे संबधित मुलींच्या तक्रारीच्या आधारे समितीने आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केला. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशान्वये शिक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच या शिक्षकाच्या विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. तर शाळेच्या मुख्याध्यपकांनाही विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच सदरची शाळा ही निवासी असल्यामुळे मुली या वसतिगृहातच राहत होत्या. त्यामुळे मुलींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटी अधीक्षिकेलाही विभागाने सेवेतून बडतर्फ केले आहे.
जाहिरात
२६ जानेवारी रोजी चलो…आझाद मैदान बेमुदत उपोषण



