नवी दिल्ली – लडाखमधील स्थितीच्या अनुषंगाने भारत आणि चीन दरम्यान कुटनीतीक चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे. तेथील फौजफाटा कमी करणे आदी मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते आहे.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थिरता असणे आवश्यक आहे आणि ही बाब बुधवारच्या बैठकीत चीनसमोर मांडण्यात आली. दरम्यान दोन्ही बाजूच्या लष्करी वाटाघाटीला लवकरच सुरुवात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. वादाचा निपटारा करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पद्धतीनुसार या वाटाघाटी होतील, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याआधी 18 वेळा दोन्ही देशांदरम्यान लष्करी वाटाघाटी झालेल्या आहेत, पण त्यात कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही.