
रत्नागिरी : दि १० जून- दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. २७ जून २०२५ पर्यंत आहे.
तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. सहा सत्रात चालणाऱ्या या अभ्यासक्रमात प्रतिवर्षी ३० विद्यार्थी गुणवत्तेनुसार निवडले जातात. पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अतिरिक्त गुणांसाठी शेतजमीन असल्यास सात – बाराचा उतारा, मासेमार असल्यास मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे प्रमाणपत्र उमेदवारांना अर्जासोबत जोडावे लागणार आहे. इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमात मासेमारी नौका बांधणी, मरीन इंजिन दुरुस्ती, मासेमारी तंत्रज्ञान, मत्स्य संवर्धन अभियांत्रिकी, मत्स्य प्रक्रिया, शितकिकरण तंत्रज्ञान या विषयी सखोल प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयाला किंवा https://www.dbskkv.org/Admission.html या संकेत स्थळाला भेट द्यावी असे आवाहन मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य/सहयोगी अधिष्ठाता डॉ. आशिष सुरेश मोहिते यांनी (दूरध्वनी क्र.०२३५२-२९९३७८, भ्रमण ध्वनी ९०२८४३६९५९ ) केले आहे.