
दीपक भोसले/संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस मार्गावर डिंगणी पोलीस ठाण्याच्या जवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा अपघात घडला आहे. हे सलग आठवे अपघात ठरले असून या मार्गावरील वळण वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहे.
वळण अत्यंत तीव्र असल्याने आणि त्यावर कोणतीही पूर्वसूचना किंवा सावधगिरीची चिन्हे नसल्याने वाहनचालकांना वेळेत वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी, अनेक वाहने थेट दरीत कोसळत आहेत. आज सकाळी घडलेला अपघात यातच अजून एक भर टाकतो. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. वळणावर योग्य दिशा दर्शक फलक, स्पीड ब्रेकर व कठडे लावणे आवश्यक आहे.
या मार्गावर दर आठवड्याला अपघात होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने त्वरीत उपाययोजना न केल्यास जनआंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.