मुंबई/ जनशक्तीचा दबाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 2 बडे नेते रामदास कदम व खासदार गजानन कीर्तीकर यांच्यातील वादाने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. रामदास कदम यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कीर्तीकरांवर टीकेची झोड उठवत त्यांच्यावर त्यांच्या पत्नीशी गद्दारी केल्याची चिखलफेक केली आहे. गजानन कीर्तीकर यांनी स्वतःच्या बायकोशी गद्दारी केली. ते पुण्याला शेण खायला जातात, असे ते म्हणालेत.
रामदास कदम व गजानन कीर्तीकर यांच्यात गत काही दिवसांपासून राजकीय चिखलफेक सुरू आहे. शिंदे गटाच्या या दोन्ही नेत्यांत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघावरून वाद सुरू आहे. कीर्तीकरांनी सोमवारी रामदास कदम यांच्याविरोधात एक प्रेसनोट जारी केली होती. त्यात त्यांनी कदमांचा उल्लेख गद्दार म्हणून केला होता. ही टीका जिव्हारी लागल्यानंतर कदम यांनी मंगळवारी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच त्यांच्या खासगी जीवनावरही निशाणा साधला.
▪️तुम्हीच पुण्याला शेण खायला जाता..
रामदास कदम मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, तुम्ही व तुमचा मुलगा एकाच कार्यालयात बसता. तुमचा मुलगा तुमचा सर्व फंड वापरतो. मग एकमेकांविरोधात उभे राहण्याचे नाटक का करता? तुम्ही माझ्याविरोधात प्रेसनोट काढली. माझा उल्लेख गद्दार म्हणून केला. तुम्हाला माझ्याविरोधात बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. उलट तुम्हीच तुमच्या पत्नीशी गद्दारी केली. तुम्ही शेण खायला पुण्याला जाता.
▪️माझ्या जीवावर निवडून आलात..
तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही आजवर तुमचा आदर केला. पण आता तुम्हीच आम्हाला बोलण्यास भाग पाडत आहात, असे रामदास कदम म्हणाले. गुहागर मतदार संघात अनंत गीतेंनी मला पाडले. मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला नव्हता. मी 33 वर्षे शाखाप्रमुख म्हणून काम केले. त्याच्या जीवावर तुम्ही निवडून आलात. त्यानंतर आता मी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा साक्षात्कार झाला. तुम्ही माझ्यावर गद्दारीचा शिक्का लावण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.
▪️महिला चपलेने मारतील…
गजानन कीर्तीकर यांनी माझ्याविरोधात प्रेसनोट काढण्याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणे आवश्यक होते. त्यांनी तिथे मलाही बोलावले असते तर ही वेळच आली नसती. आता मी त्यांचे वस्त्रहरण केले तर त्यांना एकही महिला मत देणार नाही. उलट त्यांना त्या चपलेने मारतील. त्यांचे पुण्यात काय आहे हे मी उघड केले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असेही रामदास कदम यावेळी कीर्तीकरांवर अधिक धारदार हल्ला चढवत म्हणाले.
▪️मुख्यमंत्री शिंदेंनी केला हस्तक्षेप…
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम व गजानन कीर्तीकर यांच्यातील वादात हस्तक्षेप केला आहे. त्यांनी कदम यांना तातडीने भेटण्यासाठी बोलावले आहे. या भेटीत या दोन्ही नेत्यांतील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असा अंदाज आहे. कदम यांनीही या भेटीची पुष्टी केली आहे.
▪️कीर्तीकर-कदमांत नेमका काय आहे वाद?
गजानन कीर्तीकर मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. रामदास कदम यांनी या मतदारसंघावर आपल्या मुलासाठी दावा केला आहे. गजानन कीर्तीकर यांच्या मुलाला या मतदार संघातून ठाकरे गटातून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे ते पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, अशी भीती त्यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे. यावरुन या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.