
रत्नागिरी, दि. १३ जुलै- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे केवळ एक स्थापत्य नव्हे, तर प्रेरणेचे, इतिहासाचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उभे राहणारे भव्यदिव्य स्मृतिस्थळ व्हावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या बैठकीत त्यांनी स्मारक आराखड्याचा सखोल आढावा घेतला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर तसेच विविध समित्यांचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
स्मारकासाठी प्रेरणादायी कल्पना :
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले,
“स्मारक हे असे असावे की ते इतिहासकार, अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा, विचारसरणीचा आणि बलिदानाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने साक्षात्कार व्हावा.”
त्यासाठी त्यांनी होलोग्राफीच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा जीवनप्रवास सादर करण्याची कल्पना मांडली. ध्वनी-प्रकाश प्रदर्शन (Sound & Light Show), डिजिटल गॅलरी, 3D ऍनिमेशन, तसेच आभासी वास्तूंच्या (Virtual Reality) साहाय्याने रणांगणाचे दर्शन यांचा वापर करण्यावर भर देण्यात आला.
संग्रहालय व किल्ल्यांच्या प्रतिकृतींचा समावेश:
स्मारक परिसरात धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहितीपूर्ण संग्रहालय उभारण्याची सूचना त्यांनी केली. यात त्यांच्या लढायांचा इतिहास, स्वराज्य रक्षणासाठी घेतलेली भूमिका, धर्मासाठी केलेला त्याग याचे सजीव दर्शन घडविणारे घटक असावेत.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले यांची प्रतिकृती स्वरूपात उभारणी करणे आणि त्यांची ऐतिहासिक माहिती देणारी आधुनिक मल्टीमिडिया प्रणाली उपलब्ध करून देणे, याचाही आराखड्यात समावेश करावा, असेही डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
स्थानिक मंदिरांचे संवर्धन आणि एकात्मिक विकास:
स्मारक परिसरातील प्राचीन मंदिरांचा सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून संवर्धन करून, परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. स्थानिक वास्तुविशारद, इतिहास अभ्यासक आणि तंत्रज्ञान तज्ञांच्या सहकार्याने एक समर्पक, सौंदर्यपूर्ण आणि माहितीप्रधान आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
शासनाकडून निधीची हमी:
“राज्य शासनातर्फे आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही. स्मारकात कोणतीही कमतरता राहणार नाही याची ग्वाही मी देतो,” असे डॉ. सामंत म्हणाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.