
🔷चरित्रकार पद्मविभूषण डॉक्टर धनंजय कीर यांच्यावरील दोन चरित्र ग्रंथांचे सावरकर जयंतीला प्रकाशन
उदय सामंत फाउंडेशन तर्फे “गौरव चरित्रकारांचा” या कार्यक्रमाचे शानदार आयोजन
रत्नागिरी (प्रतिनिधी) : पद्मविभूषण चरित्रकार धनंजय तथा अनंत कीर म्हणजे जिद्द, निष्ठा, परिश्रम, व्यासंग, संशोधन, प्रज्ञा, प्रतिभा या सगळ्याचा संगम होय. स्वकर्तुत्वाने त्यांनी जगाला आपली दखल घ्यायला लावली. माझी दखल घ्या असे ते कोणाला सांगायला गेले नाहीत. आपण चार भिंतींच्या आत काय शिकलो यापेक्षा जगाच्या शाळेत काय शिकलो हे खुप महत्वाचे असते. धनंजय कीर हे स्वतःच एक विद्यापीठ होते. त्यांना कोण काय शिकविणार? असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक विजय कुवळेकर यांनी काढले.
उदय सामंत फाउंडेशन तर्फे “गौरव चरित्रकारांचा” या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी स्वयंवर कार्यालयात करण्यात आले होते. रत्नागिरीचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चरित्रकार पद्मविभूषण डॉक्टर धनंजय कीर यांच्या इंग्रजी Dhananjay Keer – Life Sketch of Great Biographer व चरित्रकार धनंजय कीर या चरित्र ग्रंथांचे मराठी सुधारित आवृत्तीचे प्रकाशन सावरकर जयंतीच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत करण्यात आले. लेखक राजेंद्र प्रसाद मसुरकर यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हे दोन चरित्र ग्रंथ लिहिले आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्री. विजय कुवळेकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय कुवळेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिल्हाधिकारी देवेंद सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश देशपांडे, मरिनर दिलीप भाटकर, चरित्रकार डॉ. धनंजय कीर यांच्या चरित्र ग्रंथाच्या अभ्यासातून त्यांचे चरित्र लेखन मराठी आणि इंग्रजी भाषेतून लिहिणारे लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर, डॉ. सूनित किर, सायली नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दूरदर्शनचे जयू भाटकर यांनी केले. चरित्र ग्रंथ लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांची नात डॉ.सायली नार्वेकर यांनी लिहिलेल्या “पीएचडी बघावी करुन” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक विजय कुवळेकर म्हणाले, खरेतर उदय सामंत फाउंडेशन नावाने राजकारण विरहित संस्था काढावी असे वाटणारे महेश सामंत हे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि जो स्थापना करतो तो पडद्यामागे असतो ही चांगली बाब आहे. तळमळीने काम करणाऱ्या महेश सामंत यांचे मला कौतुक करायचे आहे. त्यांना साथ देणारे दूरदर्शनचे जयू भाटकर आणि महेश यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कारण अत्यंत चांगला असा हा पहिलाच कार्यक्रम या फाउंडेशन ने आयोजित केला आहे.
श्री. कुवळेकर पुढे म्हणाले, सावरकरांनी ज्या कोठडीत१३ वर्षे काढली त्यात तुम्ही १३ मिनिटे राहून दाखवा. कारण त्या कोठडीत सावरकर यांना १२ ते १४ फुटावर असलेल्या छोट्या झरोक्यातून केवळ बुलबुल पक्षाचे आवाज तेवढे यायचे. देशभक्ती म्हणजे काय असते….सावरकरांनी म्हटले..मला जर या बुलबुल पक्षांची भाषा आली असती तर त्यांच्या कंठातही मी देशभक्तीची गाणी घुसवली असती. त्यामुळे ज्याला अन्य काहीच सुचत नाही केवळ देशाप्रती समर्पित भावना आहे अशा आणि अस्पृश्यता निर्मूलन साठी कार्य करणाऱ्या सावरकरांचे चरित्र ज्यांनी लिहिले त्या धनंजय कीर यांचे चरित्र ग्रंथ लिहिणारे म्हणजे चरित्रकार यांचे चरित्र ग्रंथ राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिले हो सोपी गोष्ट नाही.
यावेळी बोलताना उद्योग मंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री उदय सामंत म्हणाले, १५ दिवसांपूर्वी महेश सामंत याचा फोन मला आला. आपल्याला उदय सामंत फाउंडेशन काढायचे आहे. आणि पद्मविभूषण धनंजय कीर यांच्या दोन भाषांमधील चरित्र ग्रंथांचे प्रकाशन करायचे आहे, असे म्हणाला. त्यानंतर सर्व आयोजन झाले. खरेतर आपल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहता येते की नाही याची धाकधूक मनात होती. मात्र या कार्यक्रमाला आज उपस्थत राहता आले, हे माझ्यासाठी भूषणावह आहे. चरित्रकार धनंजय कीर हे भावी पिढीसाठी दीप स्तंभ आहेत. त्यामुळे त्यांची माहिती असलेले हे दोन्ही चरित्र ग्रंथ तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. रत्नागिरीचे नाव दानशूर भागोजी शेठ किर आणि धनंजय कीर या दोन महान व्यक्तींनी सर्वदूर पोहोचविले. चरित्रकार धनंजय कीर यांचा वारसा आम्ही किती पुढे नेऊ हे मला सांगता येणार नाही, परंतु त्यांनी जी वाट आम्हाला दाखवून दिली आहे त्यावरून प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करू, एवढा शब्द मी देतो, असे मंत्री सामंत म्हणाले.
यावेळी प्रा. दत्तात्रय वालावलकर यांनी किर यांच्या इंग्रजी चारित्राबाबत माहिती दिली. त्यांनी मसुरकर यांच्या चरित्रकरांचे चरित्र लेखक यावर भाष्य केले. तसेच यावेळी ज्येष्ठ लेखक, प्रकाशक रामदास भटकळ यांचा शुभ संदेश व्हिडिओ दाखविण्यात आला. किर यांच्या आत्मचरित्र ग्रंथात जेवढे नाही ते या त्यांच्या चरित्र ग्रंथात आहे, असे सांगून त्यांनी चरित्र लेखनाची प्रशंसा केली. तर श्री प्रकाश देशपांडे म्हणाले, त्या काळात मी सावरकरांचा अनुयायी आहे हे ठामपणे सांगणे हे सोपे काम नव्हते. धनंजय तथा अनंत कीर हा त्यावेळचा मॅट्रिक असलेला माणूस काय करू शकतो, किती असामान्य कार्य करू शकतो याचे हे फार मोठे उदाहरण आहे आणि सर्वांना प्रोत्साहन देणारे आहे.
यावेळी धनंजय कीर यांचे मराठी आणि इंग्रजी भाषेतील चरित्र ग्रंथ लिहिणारे राजेंद्रप्रसाद मसुरकर म्हणाले, चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्र वाचताना त्यांनी शास्त्र शुद्ध चरित्र लेखनाचं काम केल्याचे लक्षात आले. त्यांचे चरित्रही नवीन पिढीपर्यंत जावे असे मला वाटले. त्यामुळेच मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमधून हे चरित्र आज प्रकाशित झाले हे माझेही भाग्य आहे, असे मसुरकर म्हणाले.