
देवरूख- देवरुख शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अक्षदा अनिल मोरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवत महसूल सहाय्यक अधिकारी पदाची पात्रता मिळवली आहे. तिच्या या यशामुळे देवरुखमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अक्षदाच्या या यशस्वी वाटचालीमुळे संपूर्ण शहरातून आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षणात सातत्य आणि मेहनत या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या यशाचे कौतुक करत मराठा फाऊंडेशन, देवरुखतर्फे तिला सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून भव्य सत्कार करण्यात आला आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभाला मराठा फाऊंडेशनचे सचिव श्री. तानाजीराव सावंत, श्री. श्रीकांतजी साळसकर, श्री. विलास मोरे, श्री तेजस रेवणे, भाऊ शिंदे, सौ.वनिता मोरे उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी अक्षदाने एम्. पी एस्. सी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संयम पाळला पाहिजे. अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवावेत. यश हमखास मिळेल. तसेच यशामध्ये आई- वडीलांचा खूप वाटा असतो. मुलांना अंतिम यश मिळेपर्यंत आई- वडीलांनी संयम राखणे फार गरजेचे आहे. असा बहुमोल संदेश दिला. अक्षदाने दाखवलेला आत्मविश्वास, चिकाटी आणि मेहनत इतर स्पर्धा परीक्षार्थींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.