
देवरूख- जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने देवरुख नगरपंचायतीतर्फे नगरपंचायत कार्यालयाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसर येथे कार्यालय अधिक्षक श्री. अभिजीत राणे यांच्याहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
सर्वत्र होणारी वृक्षतोड त्याबदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत असून दरवर्षी उष्णता मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याच्या सूचना शासनस्तरावरून केल्या जात आहेत. दरवर्षी नगरपंचायतीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून झाडे लावली जातात. यावर्षी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला असून तशा सूचना उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत.
यानुसार जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नगरपंचायतीतर्फे नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसराच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला व स्वच्छ भारत हरित भारत हरित प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी बांबू व शेवगा या रोपांची लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली. देवरुख नगरपंचायतीतर्फे शहरातील बचतगटांना वृक्षलागवडीकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यावेळी स्वच्छता निरिक्षक श्री. शेख यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाची पुढील रुपरेषा सर्वांना सांगून शहरातील नागरीकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यावेळी स्वच्छता निरिक्षक श्री. आरिफ शेख, सर्व अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते.