देवरुख – देवरुख येथील नावाजलेले महापुरुष गोविंद पथक. या पथकाने देवरुखसह रत्नागिरी नगरीत ६ थरांची सलामी देत हजारो रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवत मने जिंकली. देवरुखात सर्वाधिक दहीहंड्या फोडण्याबरोबर रत्नागिरी साळवी स्टॉप येथील मानाची दहीहंडी फोडण्याचा मान या पथकाला मिळाला. भाट्ये समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या दहीहंडीला या पथकाने ५ थराची सलामी ९ सेकंदात दिली.
श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या वतीने ओटीवर (अजित सावंत यांचे घरी) गेली ९७ वर्षे गोकुळाचे विधिवत पूजन केले जाते. रात्री महाप्रसाद व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम रंगतो. १२ वाजल्यानंतर बाळ गोपाळांची पावले डीजेच्या तालावर थिरकतात. गोपाळकाला दिनी दुपारी गोकुळाचे ढोल ताशांच्या गजरात सप्तलिंगी नदी पात्रात विसर्जन, शनिच्या पराजवळील हंडी फोडून फेरा सुरू होतो. यावर्षी हे सर्व कार्यक्रम आटोपून महापुरुष गोंविंदा पथक दुपारी ३ वाजता बाजारपेठेत दाखल झाले. श्री सोळजाई देवी, महारुष देवाच्या जयघोषाने देवरुख नगरी दुमदुमून गेली. क्रांती व्यापारी, दत्त मंदिर देवरुख, माणिक चौक (आनंद सार्दळ) , शिवाजी चौक येथील उइ केअर मेडिकल व भैय्या शेट्ये फाउंडेशन यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या दहीहंड्या लीलया फोडल्या.
शिवसेना देवरुख शहर व छोट्या गवाणकर मित्र मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), सह्याद्रीनगर येथील दहीहंडीला ६ थरांची सलामी देत वाहवा मिळवली. ३ ऐक्याची सलामी दिल्याने हे पथक सरस ठरले.
यानंतर हे पथक सायंकाळी ७.३० वाजता रत्नागिरीत दाखल झाले. शिवसेना शाखा कुवारबाव, स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब, राष्ट्रवादी शहर रत्नागिरी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या दहीहंडीला ६ थराची सलामी देण्यात आली.
भाट्ये समुद्रकिनारी पालकमंत्री उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीला ९ सेकंदात ५ थराची सलामी दिली. याच ठिकाणी ६ थराची देखील सलामी देण्यात आली. या पथकाला पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. साळवी स्टॉप येथील रत्नागिरी जिल्हा मोटार असोसिएशनची मानाची हंडी फोडण्याचा मान महापुरुष पथकाला मिळाला. ६ थरावर ही हंडी फोडण्यात आली. प्रत्येक ठिकाणी ३ एक्यासह ६ थर लावण्यात आले. सहाव्या थरावर सलामीसाठी गेलेल्या पवन दिलीप करंडे या लहानग्या गोविंद्याने लक्ष वेधले. प्रत्येक गोविंदाच्या जिद्द व धाडसाचे तमाम देवरुख व रत्नागिरीवासीय कौतूक व अभिनंदन करत आहेत. मंडळाचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव रविंद्र सुवारे, विनायक रेवणे, विजय मिशाळे, राकेश खवळे, संतोष हेगीत्ये यांच्या मार्गदर्शनाखाली थर लावण्यात आले.