
देवरूख- चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकणातील प्रलंबित विषय मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. याचबरोबर मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकासाठी निधी मंजूर करून घेण्यात यश मिळवण्याबरोबरच देवरुख आगार वर्कशॉप साठी नवीन सुसज्ज इमारत बांधकाम आणि देवरुख आगारात ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरू करण्याचा मुद्दा देखील या बैठकीत मांडला आहे व तसे निवेदन दिले आहे. या मुद्द्यांना ना. सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवली असल्याने हे दोन्ही विषय देखील मार्ग लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
या निवेदनानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे देवरुख एसटी बस आगार, संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. येथे १५० पेक्षा जास्त गावांपर्यंत एसटी सेवा दिली जाते, तसेच आंतर-जिल्हा आणि आंतर-राज्य सेवा देखील उपलब्ध आहे. सध्या ७३ बसेस कार्यरत आहेत, आणि ११० बसेसपर्यंत सेवा विस्तारता येऊ शकते. वर्कशॉपसाठी नवीन इमारत बांधकाम मागणीमध्ये देवरुख आगारातील वर्कशॉप इमारत १९६५ साली बांधलेली आहे आणि सध्या ती जीर्ण झालेली आहे. भिंती कमकुवत होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका आहे.
भविष्यात, देवरुख आगाराकरीता महामंडळाकडून नवीन बसेस उपलब्ध होतील ही, परंतु त्यांची योग्य देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी सुसज्ज आणि सुरक्षित कार्यशाळेची आवश्यकता आहे. म्हणून, आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज दुमजली वर्कशॉप इमारत बांधणे आवश्यक आहे. खालच्या मजल्यावर पार्किंग, वरील मजल्यावर मुख्य कार्यशाळा, अधिकारी केबिन्स आणि अत्याधुनिक रॅम्प सुविधा असावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “पे अँड पार्क” सुविधा सुरू करण्याबाबत यामध्ये देवरुख आगारात मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि कर्मचारी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करतात. सद्यस्थितीत “पे अँड पार्क” सुविधा नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. याचा मोठा अडथळा एस.टी. बस वाहतुकीस होत आहे. त्यामुळे देवरुख आगारात नियोजित पे अँड पार्क सुविधा सुरू करणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षित पार्किंग सुविधा उपलब्ध होईल, असे निकम यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.