नागपूर- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन सुरू असलेला गोंधळ बुधवारी शांत झाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या उमेदवाराच्या नावाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच पंतप्रधान जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेना पाठिंबा देईल, असेही ते म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. शिंदे यांच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, महायुतीबाबत काही लोकांच्या मनात किंतू परंतू होता, तो एकनाथ शिंदे यांनी दूर केला आहे.
आज बुधवारी फडणवीस नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. जिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महायुतीमध्ये आम्ही सर्व एक आहोत. एकनाथ शिंदे, मी किंवा अजित पवार असोत. आमच्या युतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. निवडणुकीपूर्वीही आम्ही सर्व निर्णय एकत्र घेऊ, असे सांगितले होते. आमच्याकडे ज्येष्ठ नेते आहेत आणि तेही आमच्यासोबत बसून निर्णय घेतील. त्यानुसार सर्व निर्णय घेतले जातील’, असेही फडणवीस म्हणाले.
तसेच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘असे असूनही कोणाच्याही मनात जर काही किंतू परंतु असेल तर आज एकनाथ शिंदे यांनी तो देखील दूर केला’ असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीवर त्यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे असल्याच्या प्रश्नावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत केलं गेलं असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील शिंदे यांचं कौतुक केलं आहे. शिंदे यांनी अडीच वर्षांच्या काळात महायुती मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. युतीचा नेता कसा काम करतो याचं उदाहरण हे शिंदे असल्याचं म्हणत बावनकुळे यांनी ते राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री असल्याचं सिद्ध झालं आहे, असंही सांगितलं आहे.