पोलिसांवर हल्ले सहन करणार नाही : देवेंद्र फडणवीसांचा इशारा…

Spread the love

*मुंबई :* सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचे समोर येत आहे. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली. वाहनांची जाळपोळ झाली. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत विधानसभेत निवेदन देताना सांगितले.
     

औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.
    

एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलिसांत दाखल झाले आहेत. तहसील पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण पाच गुन्हे आहेत. ११ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत. त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत. त्यातल्या एका उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण ५ नागरिक जखमी झाले आहेत. तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
     

कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. एक नक्की सांगतो की, पोलिसांवर ज्यांनी कुणी हल्ला केला असेल, त्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही. पोलिसांवर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की, सर्व समाजांचे धार्मिक सण या काळात चालले आहेत. अशा परिस्थितीत सगळ्यांनी संयम ठेवायला हवा. अशा वेळी आपल्याला कायदा व सुव्यवस्था कशी राखता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page