देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व
करावं : खासदार उदयनराजे भोसले

Spread the love

कराड :- देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करून मुख्यमंत्री बनावं अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यातील कराड इथं झालेल्या कृषी सोहळ्याच्या उद्धाटनात ते बोलत होते. यावेळी उदयनराजेंच्या फटकेबाजीने सगळ्यांमध्ये हशा पिकला.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मगाशी बैलगाडी बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कासरा पकडला तेव्हा मी सांगितले, ही सुरुवात आहे. यापुढच्या काळात तुम्हाला राज्याचा कासरा हाती घ्यावा लागणार आहे. ही सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. मतदानाची टक्केवारी पाहिली तर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपासह १४-१५ घटक पक्ष एकत्र आल्याने ४५ नव्हे तर ४८ खासदार महायुतीचे निवडून मोदींच्या पाठिशी उभे राहतील. आधीच्या सरकारमध्ये ज्या घोषणा झाल्या त्या कागदावरच होत्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्याचे धोरण अंमलात आणण्याचे काम मोदींनी केले आहे असं कौतुक उदयनराजेंनी केले. त्याचसोबत अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमबाबत काही सूचना केल्या. या सूचना लवकरात लवकर अंमलात याव्यात. त्यानंतर पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्या टीमचा कॅप्टन म्हणून तुम्ही इथं यावे आणि तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी. आम्ही तुमचे मित्रमंडळी आहोत. फक्त तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, राखीव ठेऊ नका म्हणजे झालं. कुणाला राखीव ठेवायचे आणि कुणाला नाही हे मी तुम्हाला सांगतो. मी हे बोललो त्यामुळे सगळेजण माझ्याकडे बारकाईने बघायला लागलेत. पण मी हे बोललो तरी इथं बसलेले सगळे तज्ज्ञ आहेत. ते मला राखीव म्हणून ठेवतील. त्यामुळे यांना टीममध्ये घ्या अशी फटकेबाजी उदयनराजेंनी केली.
गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्या पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. हा आमचाच बालेकिल्ला असे म्हटलं जाते. याठिकाणी दगडाला शेंदूरही फासले तरी तो निवडून येणारच असं बोलले जायचं. तेव्हा या लोकांच्या मनात एवढा अहंकार कशासाठी हा प्रश्न मला पडायचा. कृष्णाकाठचा भाग सोडला तर इतर भाग जो दुष्काळी परिसर आहे. या भागाला कुणी वरदान दिले असेल तर भाजपा लोकप्रतिनिधींनी संकल्पना मांडली आणि त्यातून आज या भागात हिरवळ पाहायला मिळते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जोपर्यंत शेतकरी प्रगतशील होणार नाही तोवर देश पुढे जाणार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपये देऊन हा भाग सिंचनाखाली आणला. ७० टक्के देशातील लोक शेतीवर अवलंबून आहेत . शेतकरी सदन होत नाही तोपर्यंत कृषी उद्योगालाही चालना मिळणार नाही. शेतकरी हा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यामुळे एकमेकांना पूरक असा हा व्यवसाय आहे असंही उदयनराजे यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page