‘क्राईम रिपोर्ट वाचण्याची विरोधकांची शिकवणी घ्यावी लागेल’, देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान…

Spread the love

“ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही ते 10 दिवस अधिवेशनाची मागणी करत आहेत. नागपुरात अधिवेशन घेण्याची मागणी केली तर कोरोना यायचा. त्यांनी पहिल्यांदा आरशात पाहावं, मग बोलावं”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

नागपूर /6 डिसेंबर 2023- विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी विरोधकांनी देशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारच्या चहापानच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “चार राज्यात चक्रीवादळ येऊन गेलं. त्यामुळे पुढच्या चार दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना जिथे शेतीचं नुकसान होतंय तिथे तातडीने पंचनामे करुन मदत देण्याचे निर्देश दिले आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आधी दिली. त्यानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.

“गुन्ह्यांच्याबाबत लोकसंख्येचा विचार करता आपण आठव्या क्रमांकावर आहे. खूनांच्या बाबत महाराष्ट्र 17 क्रमांकावर आहोत. महिलांच्या बाबत घटनांमध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. बलात्कार हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. यामध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या घटना महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे, याबाबतचं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता विरोधी पक्षाला आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. “ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही ते 10 दिवस अधिवेशनाची मागणी करत आहेत. नागपुरात अधिवेशन घेण्याची मागणी केली तर कोरोना यायचा. त्यांनी पहिल्यांदा आरशात पाहावं, मग बोलावं”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

‘विरोधी पक्षाने झोपेत पत्र लिहिलं आहे का?’…

“विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर आज बहिष्कार घातला. खरं म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्यावेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे ते पुढच्या वेळेस येतील, अशी शक्यता मला दिसत आहे. मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणं आणि जे पत्र दिलं आहे, मगाशी मी बघितलं की, त्यांच्या पत्रकार परिषदेत काही लोकं झोपी गेले होते. म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही जण झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का? असा प्रश्न पडावं, असं पत्र विरोधी पक्षाने दिलं आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘विरोधी पक्षाची काय अवस्था आहे?’…

“मला आश्चर्य वाटतं, नागपूरचं अधिवेशन हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता हे अधिवेशन होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही. विरोधी पक्षाला विदर्भ आणि मराठवाड्याचं संपूर्ण विसर पडलेला आहे, असं दिसतंय. राज्यात काय चाललंय याचं भानही त्यांना नाही. कारण त्यांनी कंत्राटी भरतीचा जीआरचा विषय काढला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीने कंत्राट भरतीचा निर्णय लागू झालेला. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे ते विरोधी पक्षाला माहिती नाही. त्यामुळे विरोधी पक्षाची काय अवस्था आहे? हे आपण बघायला आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली.

“राज्याच्या अर्थव्यवस्थेत किती वाढ झालीय, याबाबत सांगतो.

2013-14 साली आपली अर्थव्यवस्था ही 16 लाख कोटीची होती. आपली आज अर्थव्यवस्था 35 लाख कोटीची झालीय. म्हणजे गेल्या दोन वर्षात अडीच पटी पेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे. सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत बॅलेन्स अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे”, असा दावा फडणवीसांनी केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page