
चिपळूण, दि. १३ : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने ‘जी.आय.एस.चे (GIS) उपायोजन आणि रोजगार’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात मा. श्री. प्रताप पगारे यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देत GIS क्षेत्रातील करिअर संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी, भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल पवार, प्रा. डॉ. राजू झोरे, प्रा. प्रतिक्षा मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
उपप्राचार्य डॉ. मोरे यांनी भूगोल हा आधुनिकतेशी सुसंगत विषय असून, त्यातील तंत्रज्ञान आत्मसात केल्यास विद्यार्थी रोजगाराच्या नव्या संधी मिळवू शकतात, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. राहुल पवार यांनी केले. त्यांनी विभागाच्या उपक्रमांची माहिती देताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प शुल्कात GIS कोर्स उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती दिली.

श्री. प्रताप पगारे यांनी आपल्या व्याख्यानात GIS म्हणजेच ‘जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टीम’ या क्षेत्रातील अनुभव शेअर करताना, बी.ए., एम.ए. करूनही त्यांनी या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करून आय.टी. क्षेत्रातील विद्यार्थ्यांसह काम करण्याचा प्रवास सांगितला. GIS चा उपयोग नकाशे, नेव्हिगेशन, नव्या व्यवसायाचे स्थान निश्चिती, हॉटेल्स, पेट्रोल पंप, दुकान इत्यादींसाठी कसा होतो याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले.
पर्यटन, नगर नियोजन, जलव्यवस्थापन, आपत्ती निवारण, सैन्यदल, कृषी, पूर नियंत्रण यासारख्या विविध क्षेत्रांत GIS च्या साहाय्याने उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींचे PPT सादरीकरणाद्वारे सखोल विवेचन केले. विविध संस्थांतून उपलब्ध असणारे GIS अभ्यासक्रम व त्यांचे प्रवेश शुल्क याची माहितीही विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुनील भादुले, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. नलावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कला, संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील एकूण १३० विद्यार्थी या व्याख्यानासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. कामिक्षा खेडेकर हिने तर पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रतिक्षा मोहिते यांनी केला. आभार प्रा. डॉ. आर. बी. झोरे यांनी मानले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*