कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर असलेल्या तानपीर मजाराची काही अज्ञातांनी नासधूस केल्याची माहिती पहाटेच्या सुमारास समोर आली होती. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पन्हाळ्याकडे धाव घेत घटनेची पाहणी केली.यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी किल्ले पन्हाळगडावर पोलिसांमार्फत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान मुस्लिम समाजाचे श्रध्दा स्थान असलेल्या मजारीची नासधूस केल्याने गडावरील स्थानिकांकडून पन्हाळा बंदची हाक देण्यात आली आहे.संबंधित मजार ही शेकडो वर्षांपूर्व जूनी असल्याचा उल्लेख आहे.त्यामुळे हि मजारीला येथील स्थानिकांसाठी श्रद्धेचा विषय बनली होती. मात्र,गेल्या आठवड्या भरापासून या मजारीबाबत समाजमाध्यमावर गैरसमज पसरवणारा एक मेसेज व्हायरल झाला आणि त्याच वरून या मजारीची नासधूस करण्यात आली असावी असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
अशात सध्या घटनास्थळी हिंदू आणि मुस्लिम बांधव एकोपा जपण्याचा प्रयत्न देखील करत असल्याचे पाहायला मिळत आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदू-मुस्लिम समाज बांधावाकडून संबंधित मजारीची डागडुजी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पन्हाळ्यावर जाण्यास पोलिस प्रशासनाने तात्पुरती बंदी घातली असून वातावरण शांत झाल्यानंतर प्रवेश मिळणार असल्याचे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याचसोबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.