तीनवेळा आलेल्या अपयशानंतरही आयएएस होण्याची जिद्द सोडली नाही; चौथ्या प्रयत्नात ठाण्याच्या अर्पिता ठुबे यांचे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार..

Spread the love

*ठाणे-* भारतीय लोक सेवा आयोगची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. परंतु या संघर्षात काहीच लोक यशस्वी होतात. बऱ्याचदा अपयशामुळे अनेकजण हिंमत हरतात आणि प्रयत्न करणे सोडून देतात. मात्र जिद्द अन् मेहनत कायम ठेवली तर यशाचे दार नक्कीच उघडतात हे आयएएस अधिकारी अर्पिता ठुबे यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते.

ठाण्यातून येणाऱ्या अर्पिता सुरूवातीपासून शिक्षणात हुशार होत्या. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींगहून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले. परंतु देश सेवेची प्रबळ इच्छा मनात होती. त्यातूनच पुढे UPSC परीक्षेची त्यांनी तयारी सुरू केली. एक, दोन, तीन नव्हे तर चौथ्या प्रयत्नात अर्पिता ठुबे आयएएस अधिकारी होण्यात यशस्वी झाल्या. अर्पिता यांनी पहिल्यांदा २०१९ साली यूपीएससी परीक्षा दिली होती. परंतु प्रीलिम्समध्येच अपयश आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर न खचता त्यांनी हा शिकण्याचा अनुभव म्हणून पुढे तयारी सुरूच ठेवली. सातत्याने मिळणारे अपयश तरीही त्यात हिंमत न हारता पुन्हा त्या प्रयत्न करत होत्या. २०२० मध्ये पुन्हा परीक्षेला आल्या. त्यावेळी देशात ३८३ वी रँकिंग मिळवली.

त्यांची भारतीय पोलीस सेवेत निवड झाली. परंतु IAS होण्याचं त्यांचं स्वप्न कायम होते. २०२१ साली तिसऱ्यांदा अर्पिता यांनी परीक्षा दिली. परंतु यावेळीही त्या IAS साठी पात्र ठरल्या नाहीत. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात आयपीएस नोकरीतून काही काळ विश्रांती घेत यूपीएससी तयारी केली तेव्हा २०२२ साली मेहनतीला यश मिळालं. त्या २१४ व्या रॅकिंगसह IAS बनल्या. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यातून कधीही न खचता तुमची मेहनत सुरूच ठेवली पाहिजे. बऱ्याचदा अपयश येते, त्यातून खचून न जाता जिद्द, चिकाटी कायम ठेवली तर कधी तरी यश मिळतेच हेच अर्पिता ठुबे यांच्याकडे पाहिल्यास दिसून येते. जर तुमचं स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी जीवापाड मेहनत घ्यायला हवी. अशक्य असं काही नाही. अर्पिता ठुबे यांची ही कहाणी प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. ज्यांनी इतक्या अपयशानंतरही आयएएस होण्याची जिद्द सोडली नाही. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page