
कराड : मनमिळाऊ स्वभाव, नम्रता, सहकार्याची वृत्ती आणि तळमळीची कार्यशैली यामुळे पुणे विभागीय माहिती उपसंचालक किरण मोघे यांनी शासन, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीच्या गौरवार्थ महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने त्यांचा नुकताच पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयात सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोरख तावरे, सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, पुणे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर तसेच सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
किरण मोघे यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असताना पारदर्शक आणि संवादात्मक वृत्ती जपत पत्रकारांशी सुसंवाद राखला. शासनाच्या विविध योजनांची स्पष्ट आणि समजूतदार पद्धतीने माहिती देत त्यांनी विश्वासार्हतेचे उदाहरण निर्माण केले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती पुणे विभागीय माहिती उपसंचालकपदी केली आहे. ही निवड राज्यातील संपादक व पत्रकारांसाठी गौरवाची बाब असल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या गौरवपत्रावर महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, सचिव अनंत पाध्ये आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोरख तावरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.