
१८ मे/मुंबई– राजाचा जीव पोपटात आहे, दुसरा पोपट कोणता आहे तर बीएमसी असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच असा निर्धारही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत.

त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
अडीच वर्ष कोरोना संकट होते, दुष्काळात तेरावा महिना तसे उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. अशा काळात भाजपाचा एकही कार्यकर्ता घरी बसला नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करत होतो. अडीच वर्षांनी आपल्या आशीर्वादाने शिवसेना आणि भाजप सरकार आलं आहे. शिवसेना नेते मोदींचे मोठे मोठे फोटो लावून निवडून आले होते. मोदींचे मोठे फोटो आणि उद्धव ठाकरेंचा स्टँप साईज फोटो लावत होते.

राजाच्या मेलेल्या पोपटाची गोष्ट सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, सातत्याने बेकायदेशीर सरकार असल्याचे सांगत होते. पण सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांचेच सरकार कायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब केलं. काही जण बोलतात, आम्हीच जिंकलो. आताचं सरकार टिकणारं आहे, काम करणारं आहे, पुन्हा निवडून येणारं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वसुली किती केली यासाठी वाजेची कथा सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रावर सूड उगवण्याचे काम यांनी केले. भुयारी मेट्रो सुरु झाली असती, ती यांनी थांबवून ठेवली. परिणामी 10 हजार कोटींनी खर्च वाढला. हेच पैसे गरिबांसाठी कामाला आले असते. नरेंद्र मोदी आणि भाजपाला श्रेय मिळेल म्हणून गरिबांचे अनुदान अडवले.