कोकणात रिफायनरी होणारच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिकेवर ठाम

Spread the love

दबाव प्रतिनिधी, मुंबईः कोकणातील रिफायनरी ही आशियातील सर्वात मोठी ग्रीन रिफायनरी असणार आहे. यात केंद्र सरकारच्या तीन कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरीमुळे जशी गुजरातची अर्थव्यवस्था चालते, त्याप्रमाणेच पुढच्या १०-१५ वर्षांसाठी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार असून, रिफायनरी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. यासाठी सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

दरम्यान, पत्रकार शशिकांत वारिसे यांचा हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नसून, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात आमदार अतुल भातखळकर, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुनील प्रभू यांच्यासह अनेक आमदारांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील घोषणा केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, रिफायनरीसमर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी राजकीय नेत्यांचे लावलेले पोस्टरही यावेळी सभागृहात दाखवित वारिसे यांच्या खुनाच्या तपासात राजकीय दबाव येण्याची शक्यता वर्तविली. तर वारिसे यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक आमदार राजन साळवी यांनी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जामनगर रिफायनरीवर संपूर्ण गुजरातची अर्थव्यवस्था चालते. त्याचप्रमाणे या रिफायनरीचा राज्याला पुढची १० ते १५ वर्षे फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील तीन कंपन्या यात गुंतवणूक करतील. आशियातील सर्वात मोठी अशी ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. राजापूर येथील कातळशिल्पांना या रिफायनरीमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार काम करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page