कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब; कर्जाचा डोंगर आणि बरचं काही; नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार…

Spread the love

गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात नाही आणि त्यामुळे शासनाने नेमलेले प्रशासक हे ग्रामपंचायत कार्यालयात आठ आठ दिवस फिरकत नाहीत.





कर्जत रायगड : तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये कामगार वर्गाचे पगार होत नाहीत. कर्मचाऱ्यांचे पगार करायला पैसे नाहीत,तर विजेचे ९० लाखाचे बिल थकीत असून कोणत्याही क्षणी वीज पुरवठा खंडित केला जाऊ शकतो.तर अन्य प्रशासकीय कामांसाठी लागणारा खर्च आणि कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांसाठी घेतलेले कर्ज यांमुळे ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झालेली आहे.दरम्यान,गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ग्रामपंचायती मध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात नाही आणि त्यामुळे शासनाने नेमलेले प्रशासक हे ग्रामपंचायत कार्यालयात आठ आठ दिवस फिरकत नाहीत.

आर्थिक दृष्ट्या सक्षम अशी बिरुदावली म्हणवून घेणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत मधील कारभार जनतेच्या मुळावर आला आहे.जनतेचे अर्ज अनेक महिने पेंडींग असून सदस्य मंडळ बरखास्त झाल्यानंतर शासनाने नेमलेल्या प्रशासक यांच्याकडून त्या अर्जांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत मधील कारभाराला जनता कंटाळली आहे.त्यानंतर ग्रामपंचायतीवर असलेले आर्थिक संकट आणि नियोजनाचा अभाव यामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार जवळपास ठप्प झाला आहे.सध्या नेरळ ग्रामपंचायत मध्ये रस्त्यांवरील स्वच्छता शिवाय अन्य कोणतीही कामे होत नाहीत. ग्रामस्थांना सोयी सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.ग्रामपंचायत कडून दिले जाणारे पाणी शुध्दीकरण करून देण्यात येत असल्याचे सांगितले जाते,मात्र दररोज नळाद्वारे येणारे पाणी गढूळ येत आहे.पाणी शुध्दीकरण करणेसाठी आवश्यक असलेले आलम टीसीएल यांची खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत.त्यामुळे २५ हजार हून अधिक लोकसंख्येला गढूळ पाणी प्यावे लागत आहे.या पाण्याशिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे नेरळ ग्रामपंचायतीकडे महावितरण कंपनीचे ९० लाखाचे बिल थकीत आहे.त्यामुळे कोणत्याही क्षणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो आणि त्यामुळे पाणी पुरवठा बंद होऊ शकतो. रस्त्यांवरील दिवे बदली करण्यास पैसे नाहीत अशी ग्रामपंचायतीची दयनीय अवस्था आहे.

ग्रामपंचायती मध्ये असलेले १०५ कर्मचारी यांचे पगार देण्यासही पैसे नाहीत.ग्रामपंचायती कडे काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचे वेतन थकले आहे.त्यात २२ कार्यालयीन कर्मचारी आणि सफाई तसेच आरोग्य,वीज,पाणी कर्मचारी यांना मिळून महिन्याला २२ लाखाचे वेतन द्यावे लागते. मात्र ग्रामपंचायती आर्थिक स्थिती ढासळली असल्याने पाच महिन्याचे मिळून किमान एक कोटीच्या वेतन थकले आहे.ग्रामपंचायत हद्दी मधील कचरा उचलण्यासाठी कचरा गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे,त्या दोन कचरा गाड्या यांचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैशांची गरज दर महिन्याला भासते.तर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणारा खर्च करणे देखील कठीण होऊन बसले आहे.त्यात ग्रामपंचायती मधील सार्वजनिक हिताची विकास कामे बंद झाली आहेत.विकास कामे करण्यासाठी पैसे शिल्लक राहत नसल्याने विकास कामे ठप्प झाली असून मागील पाच वर्षात करण्यात आलेल्या विकास कामे यांचे किमान एक कोटी रुपये ग्रामपंचायत प्रशासन देणे असून ग्रामपंचायत कडून देण्यात आलेल्या कार्यादेश नंतर कामे पूर्ण करणारे ठेकेदार फेऱ्या मारत आहेत.मात्र ठेकेदार यांना त्यांनी केलेल्या कामांचे पैसे देण्यास ग्रामपंचायत आर्थिक कोंडीमुळे सक्षम नाहीत असे सिद्ध झाले आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत राहणारे रहिवाशी यांच्याकडून करावाटे येणारे उत्पन्न आणि पाणीपुरवठा केल्यानंतर येणारे उत्पन्न हे साधारण सहा कोटींचे आसपास आहे.मात्र कामगारांचे वेतन,सार्वजनिक सुविधा यांचा खर्च आणि विजेचे बिल यांचा विचार करता आवक आणि जावक यांचा ताळमेळ जमत नाही.

सदस्य मंडळ सप्टेंबर २०२४ पासून अस्तिवात नाही आणि असे असताना शासनाने नियुक्त केलेले प्रशासक सुजित धनगर हे आठ आठ दिवस नेरळ ग्रामपंचायत कडे फिरकत नाहीत.त्यामुळे प्रशासकीय कामे ठप्प झाली असून अनेक फाईली क्लिअर होण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे प्रशासक हे पद नेरळ ग्रामपंचायत साठी अन्यायकारक असल्याची चर्चा ग्रामपंचायत हद्दी मधील रहिवाशी यांच्याकडून व्यक्त होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page